राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडले; अनिल देशमुखांची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 11:42 AM2024-03-22T11:42:35+5:302024-03-22T11:44:12+5:30

भाजपचे आमदार सर्वाधिक दुःखी ते म्हणतात, आम्हाला बाजूला ठेवून बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदे दिली जातात

The Nationalist Congress leaders were attacked by fear of something Anil Deshmukh criticizes BJP | राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडले; अनिल देशमुखांची भाजपवर टीका

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडले; अनिल देशमुखांची भाजपवर टीका

बारामती : गेल्या दोन वर्षांपासून राज्यात तोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. भाजपच्या माध्यमातून शिवसेना फोडण्यात आली. प्रत्येक आमदाराला ५० कोटी देऊन आमचे सरकार पाडले. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्राने, देशाने उघड्या डोळ्यांनी हे राजकारण पाहिले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. ईडी, सीबीआयची भीती दाखवायची. येत्या लोकसभा निवडणुकीत जनता याचे उत्तर देईल, अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर केली.

बारामती येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची देशमुख यांनी ‘गोविंदबाग’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बारामतीत गोविंदबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत भटक्या विमुक्त सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी पुत्र व कन्येच्या प्रेमापोटी शिवसेना व राष्ट्रवादी फुटली, या केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या टीकेला उत्तर देताना ही टीका केली.

देशमुख पुढे म्हणाले, फोडाफोडीला जनता कंटाळली असून, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ती उत्तर देईल. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटात सध्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. आमचे जे लोक त्यांच्यासोबत गेले आहेत, त्यातील अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांना आपली दिशाभूल झाल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक आल्यानंतर मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या आमदारांची मोठ्या प्रमाणात घरवापसी झाल्याशिवाय राहणार नाही, असादेखील दावा देशमुख यांनी केला.

देशमुख पुढे म्हणाले, सध्या भाजपचे आमदार बिचारे सर्वांत दु:खी आहेत. आम्हाला ते विधानसभेत भेटतात. ते म्हणतात बाहेरून आमच्या पक्षात आलेले लोक मंत्री होतात, आम्ही त्यांच्या तोंडाकडे पाहत बसतो. बाहेरून येणारे पहिल्या पंक्तीत बसले. आमचा अजून नंबर लागत नाही. त्यांना बाजूला ठेवून बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदे दिली जातात. त्यामुळे या सगळ्यात भाजपचे आमदार सर्वाधिक दुःखी आहेत. त्यांच्या मनात नाराजीची भावना असल्याचे देशमुख म्हणाले.

यावेळी देशमुख यांनी सुप्रिया सुळे यांचे काैतुक केले. सुळे यांचे गेल्या १५ वर्षांतील काम संपूर्ण देशाला माहीत आहे. केंद्र व राज्याच्या माध्यमातून त्या विकासासाठी प्रयत्नशील राहिल्या आहेत. कामाच्या बाबतीत सतर्क असणाऱ्या खासदार म्हणून त्या ओळखल्या जातात. बारामती मतदार संघातील जनता त्यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देईल, असे देशमुख म्हणाले.

Web Title: The Nationalist Congress leaders were attacked by fear of something Anil Deshmukh criticizes BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.