प्रयोगादरम्यान कलाकाराच्या पायावरून उंदराची उडी अन् मागे मांजर; बालगंधर्वमध्ये रंगला खेळ
By श्रीकिशन काळे | Updated: March 1, 2025 20:46 IST2025-03-01T20:43:47+5:302025-03-01T20:46:35+5:30
बालगंधर्व रंगमंदिरामधील उंदीर-मांजराचा खेळ पाहून आम्हाला प्रचंड त्रास झाला, एकूण रंगमंदिराची यंत्रणा ढिसाळ झालीये - कलाकार

प्रयोगादरम्यान कलाकाराच्या पायावरून उंदराची उडी अन् मागे मांजर; बालगंधर्वमध्ये रंगला खेळ
पुणे: बालगंधर्व रंगमंदिराचे नूतनीकरण करण्यात आले असले, तरी तेथील समस्यांचे ‘नाट्य’ काही थांबता थांबत नाही. नुकताच एका नाटकाचा प्रयोग सुरू असताना कलाकाराच्या पायावरून उंदराने उडी मारली आणि त्या उंदराच्या मागे मांजर पळत असल्याचे ‘नाट्य’ प्रयोगादरम्यान प्रेक्षकांना पाहायला मिळाले. त्यामुळे कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
गेल्या अनेक वर्षांपासून बालगंधर्व रंगमंदिरामध्ये समस्या ‘जैसे थे’ आहेत. गेल्या वर्षी रंगमंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. तेव्हा तेथील खुर्च्या, साउंड सिस्टम, एसी, पडदे, आदी यंत्रणा सुधारण्यात आल्या. परंतु, त्या सुधारल्यानंतरही नवनवीन समस्या समोर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी रसिकांना डासांचा प्रचंड त्रास होत होता. तो पुन्हा सुरू झाला आहे. पायांना डास चावत असल्याने रसिक वैतागले आहेत. तसेच कलाकारांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
शुक्रवारी (दि. २८) रंगमंदिरात ‘सूर्याची पिल्ले’ हा नाट्यप्रयोग होता, तेव्हा गार्गी फुले या प्रयोग सादर करत असताना त्यांच्या पायावरून उंदीर गेला. तेव्हा त्या मध्येच दचकल्या. त्यानंतर मागोमाग दोन-तीन मांजरीही पाहायला मिळाल्या. त्या मांजरी बिनधास्त प्रेक्षागृहात फिरत होत्या. काही प्रेक्षकांनी उठून त्या मांजरांना बाहेर काढण्याचा प्रयत्नदेखील केला. प्रयोग सादर करताना मध्येच ‘एसी’ कमी-जास्त केला जात होता, त्यामुळे गार्गी फुले व इतर वैतागले. रंगमंदिराच्या दरवाजावर दोन सुरक्षारक्षक तिकिटे पाहून रसिकांना आत सोडत होते. त्यांतील एकजण तर बिनधास्त आत खुर्चीवर बसून मोबाइलवर रील्स पाहत होता. या सर्वांवर अभिनेत्री गार्गी फुले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
बालगंधर्व रंगमंदिरामधील उंदीर-मांजराचा खेळ पाहून आम्हाला प्रचंड त्रास झाला. प्रयोग करताना माझ्या पायावरून उंदीर गेला. डासांचे प्रमाण वाढलेले होते. मांजरी इकडे-तिकडे फिरत होत्या. एकूणच रंगमंदिराची यंत्रणा ढिसाळ झाली आहे. - गार्गी फुले, अभिनेत्री