आई ती आईच; बिबट्याचं तोंड दाबून धरलं, ८ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला वाचवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 01:58 PM2023-10-11T13:58:15+5:302023-10-11T13:59:56+5:30

कुशीत झोपलेल्या ८ महिन्याच्या मुलाला बिबट्या घेऊन जात असताना आईने केला प्रतिकार अन् मुलाला वाचवले

The mother is the mother Suppressing the leopard mouth saving the 8 month-old stomach bullet! | आई ती आईच; बिबट्याचं तोंड दाबून धरलं, ८ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला वाचवलं!

आई ती आईच; बिबट्याचं तोंड दाबून धरलं, ८ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला वाचवलं!

विलास शेटे

मंचर: आईच्या कुशीत झोपलेल्या आठ महिन्याच्या मुलाला बिबट्याने हात तोंडात धरत ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आईने आपल्या जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या हल्ल्यातून पोटच्या गोळ्याला वाचविले आहे. देवा करगळ असे वाचलेल्या मुलाचे नाव आहे. ही थरारक घटना आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील फुटाणेमळ्यात आज पहाटे घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात हा छोटा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील फुटाणेमळा येथे सुखदेव फुटाणे यांच्या शेतात धोंडीभाउ करगळ या मेंढपाळाचा वाडा बसलेला होता. मेंढपाळ धोंडीभाऊ करगळ यांची पत्नी सोनल करगळ ही तिचा आठ महिन्याचा मुलगा देवा याला घेऊन वाड्याचे बाहेर झोपली होती. रात्री दोन वाजता देवा या मुलाचा हात अंथुरणाच्या बाहेर आला होता. त्यावेळी मेंढ्यांची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या बाजूलाच दबा धरून बसला होता. या बिबट्याने हल्ला करण्याच्या उद्देशाने मुलाचा हात तोंडात धरत ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आई सोनल करगळ यांना जागा आली. तिने मुलाला ओढत असलेल्या बिबट्याला प्रतिकार केला. एका हाताने बिबट्याचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत एका हाताने मुलाला वाचवण्यासाठी धडपड सुरू होती. या दरम्यान जोरजोरात आरडाओरडा केला. त्यावेळी तिच्या कुटुंबातील सदस्य बाहेर येत त्यांनीही आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या पळून गेला. या हल्ल्यात आठ महिन्याचा मुलगा देवा धोंडीभाऊ करगळ याच्या हाताला दात लागला असून पोटाला नख्या लागल्या आहेत. 

घटनेची माहिती कळताच स्थानिक शेतकरी बिबट रेस्क्यू सदस्य यांनी मेंढपाळ कुटुंब यांना धीर देत मुलाला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या या मुलावर मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन कर्मचाऱ्यांनी सकाळी येऊन घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दोन दिवसापूर्वीच जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहानग्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आंबेगाव तालुक्यातही बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने परिसरात पिंजरा लावुन बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहे.मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस  म्हणाल्या हा परिसर बिबट्या प्रवन क्षेत्र असल्यामुळे मेंढपाळांनी रात्रीच्या वेळेस झोपताना खबरदारी घ्यावी ज्या ठिकाणी विजेची  व्यवस्था असेल त्या ठिकाणी झोपावे व कुटुंबातील सदस्यांनी राखणदारी करावी. असे आवाहन राजहंस यांनी केले आहे.

Web Title: The mother is the mother Suppressing the leopard mouth saving the 8 month-old stomach bullet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.