Cyber Crime: बँकेच्या मॅनेजरनेच घातला २७ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Updated: May 5, 2023 16:57 IST2023-05-05T16:56:28+5:302023-05-05T16:57:02+5:30
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली

Cyber Crime: बँकेच्या मॅनेजरनेच घातला २७ लाखांचा गंडा
पुणे: बँकेत मॅनेजर असल्याचा गैरफायदा घेत शेअर्स कमी किमतीत घेऊन देतो असे सांगत २७ लाख ४६ हजार ५७४ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन बळीराम इतापे (३६, रा. वाघोली) यांना आरोपी अशोक सूर्यकांत कदम याने आयसीआयसीआय बँकेत मॅनेजर आहे असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. आयसीआयसीआय सिक्युरिटीचे शेअर्स कमी किमतीत खरेदी करून देतो असे सांगत इतापे यांच्याकडून वेळोवेळी फोन पे, गुगल पे, आणि एनईएफटीद्वारे २७ लाख ४६ हजार ५७४ रुपये स्वतःच्या खात्यावर मागवून घेतले. त्यांनतर त्यांच्या शेअर्स सिक्युरिटीच्या पोर्ट-फोलिओमध्ये बनावट जमा रक्कम दाखवून ती खरी असल्याचे भासवले. मात्र त्यांनतर इतापेंना या सगळ्या बाबी संशयास्पद वाटल्याने, त्यांनी यासंदर्भात खातरजमा केली असता त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत अशोक कदम विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश वराळ हे करत आहेत.