कुरुलकरने दिलेली माहिती गोपनीय नसून, सार्वजनिक स्थळांवर उपलब्ध
By नम्रता फडणीस | Updated: September 4, 2023 21:16 IST2023-09-04T21:15:58+5:302023-09-04T21:16:46+5:30
कुरुलकर खटला इन कँमेरा घेण्याला बचाव पक्षाचा आक्षेप

कुरुलकरने दिलेली माहिती गोपनीय नसून, सार्वजनिक स्थळांवर उपलब्ध
पुणे : संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) चा संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानी हस्तक महिलेला पाठविलेली माहिती गोपनीय नसून, ती माहिती सार्वजनिक स्थळांवर उपलब्ध आहे असे सांगत कुरुलकर याचे वकील अँड. ॠषीकेश गानू यांनी कुरुलकर खटला ’इन कँमेरा’ घेण्याबाबत सोमवारी (दि.4) आक्षेप नोंदविला. या अर्जावर पुढील सुनावणी दि.8 सप्टेंबर रोजी होणार आहे.
डॉ. प्रदीप कुरुलकर याने ब्राह्मोस आणि अग्नी अशा विविध क्षेपणास्त्रांची दिलेली गोपनीय माहिती सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध नाही. ही माहिती अत्यंत संवेदनशील आहे. सुनावणी दरम्यान ही माहिती जनतेसमोर खुली झाल्यास देशाच्या सार्वभौमत्वाला आणि हिताला बाधा पोहोचू शकते. त्यामुळे हा खटला इन कँमेरा घ्यावा अशा मागणीचा अर्ज सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयात सादर केला होता. त्याला बचाव पक्षाने हरकत घेतली. दरम्यान, कुरुलकरचे वकील अँड गानू यांनी तपासादरम्यान एटीएसकडे असलेली गोपनीय कागदपत्रे (सील डॉक्यूमेंट) मिळावीत असा अर्ज न्यायालयात केला आहे. त्या अर्जावर सरकारी वकील अँड विजय फरगडे यांनी हरकत घेतली व त्यासंदर्भातील लेखी जबाव न्यायालयात सादर केला. त्यात नमूद करण्यात आले आहे की हे प्रकरण जामिनाच्या स्टेजला आहे. सुनावणीच्या वेळेस कायदेशीर तरतुदींनुसार ही गोपनीय कागदपत्रे देण्यात येतील.