'पुण्यातील बांगलादेशींची वाढती संख्या गंभीर...' मंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 20:41 IST2025-01-22T20:39:22+5:302025-01-22T20:41:07+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले

'The increasing number of Bangladeshis in Pune is serious...' warns Minister Chandrakant Patil | 'पुण्यातील बांगलादेशींची वाढती संख्या गंभीर...' मंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा

'पुण्यातील बांगलादेशींची वाढती संख्या गंभीर...' मंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा

पुणे - शहरात बांगलादेशी नागरिकांची वाढती संख्या गंभीर समस्येला कारणीभूत ठरू शकते, असा इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. "शहरातील कोणताही फेरीवाला किंवा मजूर संशयास्पद वाटल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती देणे नागरिकांचे कर्तव्य आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यात लोकसंख्येच्या झपाट्याने वाढीमुळे विविध समस्या उभ्या राहत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पुणे पोलिसांच्या पश्चिम विभागात विविध गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला तब्बल ३.८४ कोटी रुपयांचा ऐवज ३०० तक्रारदारांना परत करण्यात आला. या कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी बांगलादेशी घुसखोरांविषयी भाष्य करत, त्यांच्या समस्यांवर केंद्र व राज्य सरकार ठोस पावले उचलत असल्याचे सांगितले.

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना ओळखून त्यांच्या मायदेशी परत पाठवणे आणि त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत," अशी माहिती पाटील यांनी दिली. पुणे व मुंबई या शहरांतील बांगलादेशी नागरिकांच्या वाढत्या संख्येमुळे सुरक्षा व्यवस्थेवरही ताण येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तक्रारदारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला ऐवज न्यायालयीन आदेशानुसार तक्रारदारांना परत करण्याच्या प्रक्रियेत वेग आणण्याचे निर्देश दिले. "तक्रारदारांना मालकत्वाचा पुरावा सादर केल्यानंतर एक महिन्याच्या आत त्यांचा ऐवज परत करण्यात यावा," असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत सर्व पोलिस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: 'The increasing number of Bangladeshis in Pune is serious...' warns Minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.