शहरातील ५,६ मजल्यांच्या अनधिकृत बांधकामांवरही बसणार हातोडा; पुणे महापालिकेने घेतले ३ कोटींचे मशीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 15:34 IST2022-05-13T15:33:38+5:302022-05-13T15:34:21+5:30
शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी नेहमी भाडेतत्त्वावर मशिनरी घेणाऱ्या पुणे महापालिकेने, गुरुवारी स्वत:च्या मालकीचे मेकॅनिकल माउंटेड जॉ क्रशर मशीन खरेदी केले आहे

शहरातील ५,६ मजल्यांच्या अनधिकृत बांधकामांवरही बसणार हातोडा; पुणे महापालिकेने घेतले ३ कोटींचे मशीन
पुणे : शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी नेहमी भाडेतत्त्वावर मशिनरी घेणाऱ्या पुणे महापालिकेने, गुरुवारी स्वत:च्या मालकीचे मेकॅनिकल माउंटेड जॉ क्रशर मशीन खरेदी केले आहे. या मशीनद्वारे ५ ते ६ मजल्यांपर्यंतच्या इमारतींवर कारवाई करता येणे शक्य होणार आहे.
महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाकरिता हायड्रॉलिक डिमॉलिशन मशीन ट्रेलरसह पाच वर्षे कालावधीसाठी देखभाल दुरूस्तीसह खरेदी करण्यात आले आहे. सुमारे तीन कोटी रुपये या मशीनची किंमत आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना भाडेतत्त्वावर मशिनरी घेताना मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने, या मशीनमुळे महापालिकेच्या खर्चामध्ये मोठी बचत होणार आहे.
या मशीनचा वापर पुणे महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याकरिता करण्यात येणार आहे. शहरात आपत्ती निर्माण झाल्यास मुंबई, ठाणे आदी शहरातून अशी मशिनरी मागवावी लागत होती. परंतु, आता ही मशीन पालिकेकडेच उपलब्ध झाल्याने, आपत्ती व्यवस्थापन करताना नैसर्गिक, प्राण व वित्त हानी या सर्व बाबी टाळता येता येणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत या मशीनची पूजा करण्यात आली. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रवींद्र बिनवडे, उपआयुक्त माधव जगताप, महेश डोईफोडे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख आदी उपस्थित होते.