उड्डाणपुलाचा आराखडा दुरुस्त करून काम करावे - सुप्रिया सुळे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 19:39 IST2025-01-22T19:38:37+5:302025-01-22T19:39:51+5:30
विकासकामांना विरोध नाही; पण, चुकीचे काम होणार असेल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही

उड्डाणपुलाचा आराखडा दुरुस्त करून काम करावे - सुप्रिया सुळे यांची मागणी
जेजुरी : कुलदैवत खंडेरायाच्या नगरीतील जुनी जेजुरी येथील सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा आराखडा सदोष आहे. पुढील पन्नास वर्षांचा विचार करून आराखडा बदलण्यात यावा व स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन उड्डाणपुलाचे काम करण्यात यावे, विकासकामांना विरोध नाही; पण, चुकीचे काम होणार असेल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी बिग्रेडचे अध्यक्ष तथा देवसंस्थानचे माजी विश्वस्त संदीप जगताप व जुनी जेजुरी येथील नागरिकांनी दिला असून, याबाबत खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले आहे.
आळंदी - पंढरपूर पालखी राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ या रस्त्याचे रुंदीकरण सध्या द्रुतगतीने सुरू असून, सध्या झालेल्या कामांचा दर्जा आणि गुणवत्ता तपासण्याची गरज आहे, या मार्गावर रोजच अपघात होत असून, अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यातूनही या मार्गावर रुंदीकरण झाले मात्र अतिक्रमणे तितक्याच प्रमाणात वाढली आहेत. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे जुनी जेजुरी येथील उड्डाणपुलाचे प्रस्तावित काम सदोष आहे तेथील नागरिकांनी हे काम बंद पाडले आहे. जोपर्यंत येथील आराखडा दुरुस्त होऊन ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही, असा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.
बुधवारी (दि. २२) खा. सुप्रिया सुळे या जेजुरीत देवदर्शनासाठी आलेल्या असताना येथील माजी नगरसेवक सत्यवान उबाळे, संपत कोळेकर, सुरेश उबाळे, रोहिदास जगताप, महेश उबाळे, अजय जगताप यांनी भेट घेत निवेदनाद्वारे आपल्या समस्या मांडल्या.