Pune Metro: वीज गेली अन् धावती मेट्रोही थांबली! २० मिनिटे मेट्रो बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 14:00 IST2023-08-17T14:00:19+5:302023-08-17T14:00:43+5:30
दरम्यान, २० मिनिटे मेट्रो बंद होती...

Pune Metro: वीज गेली अन् धावती मेट्रोही थांबली! २० मिनिटे मेट्रो बंद
पुणे : वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गावर धावणारी मेट्रो सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता अचानक थांबली. वीज पुरवठाच खंडित झाल्यामुळे मेट्रो थांबल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
त्यांनी तातडीने लक्ष घालून वीज पुरवठा सुरू करून दिला. दरम्यान, २० मिनिटे मेट्रो बंद होती. आता महामेट्रो व वीज कंपनी यांच्याकडून नक्की काय झाले होते, याची संयुक्त चौकशी सुरू असल्याचे मेट्रोचे जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.
रेंजहिल कॉर्नरजवळ मेट्रोला वीज पुरवठा करणारे अतिउच्चदाब १३२ केव्ही उपकेंद्र आहे. तिथे देखभाल दुरूस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे वीज यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मेट्रो थांबली, असे महापारेषण या वीज कंपनीचे म्हणणे आहे.