जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील दुहेरी वाहतूक तीन वर्षांनी पूर्ववत, वाहनचालकांचा वळसा वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 16:19 IST2024-05-02T16:19:21+5:302024-05-02T16:19:58+5:30
मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी बोपोडी चौक ते चर्च चौक यादरम्यानच्या वाहतुकीत मार्च २०२१ मध्ये बदल करण्यात आले होते...

जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील दुहेरी वाहतूक तीन वर्षांनी पूर्ववत, वाहनचालकांचा वळसा वाचणार
पुणे :मेट्रोच्या कामासाठी जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चौक ते चर्च चौक दरम्यान बंद केलेली दुहेरी वाहतूक बुधवारपासून (दि .१) तीन वर्षांनी पूर्ववत झाली . यामुळे आता पिंपरीकडून पुण्यात येणाऱ्या वाहनचालकांचा वळसा वाचणार आहे.
मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी बोपोडी चौक ते चर्च चौक यादरम्यानच्या वाहतुकीत मार्च २०२१ मध्ये बदल करण्यात आले होते. बोपोडी चौकातून पुण्याकडे येणारी वाहने डावीकडे वळविण्यात आली होती. पुण्याकडे येणारी वाहतूक खडकी बाजार, खडकी बाजार बस स्थानक, अष्टविनायक मंदिर, मुळा रस्त्याने वळविण्यात आली होती. खडकी बाजारमधून जाणाऱ्या वाहनचालकांना खडकी रेल्वे स्थानक, बोपोडी चौकमार्गे पिंपरीकडे जावे लागत होते.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बोपोडी चौक ते संविधान चौक या दरम्यानचा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता खुला करण्यात आला आहे. रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, बोपोडी चौक ते होळकर चौक दरम्यान एलफिस्टन रस्त्यावर जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.