डीजेचा धांगडधिंगा नकोसा वाटतो; पण ‘सवाई’ मधील संगीतातून मिळते मनशांती; महिला बाऊन्सर्स भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 14:07 IST2022-12-18T14:06:59+5:302022-12-18T14:07:22+5:30
सध्या महोत्सवात इतर रसिकांप्रमाणे महिला बाऊन्सर्संनाही कलाविष्कारांचा श्रवणीय आनंद मिळत आहे

डीजेचा धांगडधिंगा नकोसा वाटतो; पण ‘सवाई’ मधील संगीतातून मिळते मनशांती; महिला बाऊन्सर्स भावना
पुणे : परवा रात्री एका तरुण कलाकाराचे खूप छान वादन ऐकले. आम्हाला त्याचे नाव माहिती नाही; पण आम्हालाही खूप आवडले. राहुल शर्मा यांनीही इतकं अप्रतिम वाजवलं की आम्ही ऐकून अक्षरश: थक्क झालो... हे बोल आहेत, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात कलाकारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडणाऱ्या महिला बाऊन्सर्सचे. संगीत ऐकून मनाला इतकी शांती मिळते की महोत्सवातून घरी गेल्यानंतर शांत झोप लागते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
देश-विदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची जादू कोरोनाच्या दोन वर्षांच्या विरामानंतरही तसूभरदेखील कमी झालेली नाही. कितीही संगीताची विविध ऑनलाइन ॲप बाजारात उपलब्ध असली तरी अभिजात संगीतातील दिग्गज कलाकारांना ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्याचा आनंद वेगळाच असतो. सध्या महोत्सवात इतर रसिकांप्रमाणे महिला बाऊन्सर्संनाही कलाविष्कारांचा श्रवणीय आनंद मिळत आहे. त्यांची महोत्सवातील उपस्थिती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आयोजकांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याबरोबर संगीताचा आनंददेखील त्या मनमुरादपणे घेत आहेत.
...तरीही थकवा जाणवत नाही
महिला बाऊन्सर्स म्हणून काम करणाऱ्या ज्योती मानकर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाल्या की, आम्ही गणेशोत्सवासह इतर कार्यक्रमांमध्येदेखील बाऊन्सर्स म्हणून जातो; पण तो डीजे किंवा धांगडधिंगा करणारा, कानठळ्या बसविणारा आवाज ऐकल्यानंतर नकोसे होते. संगीत याला म्हणतात का? असं वाटतं. संगीत असं हवं की जे मनाला शांती देतं. ‘सवाई’ महोत्सवात आलं की आम्हाला प्रसन्न वाटते. तब्बल ८ ते ९ तास आम्ही उभे असतो; पण, कोणताही थकवा जाणवत नाही. इतके दिग्गज कलाकार आम्हाला जवळून ऐकायला मिळत आहेत, याचाच आम्हाला आनंद आहे.
''मला संगीत शिकण्याची इच्छा होती. मात्र, काही कारणास्तव ते शिकता आले नाही; पण चांगलं संगीत कानावर पडतंय याचही समाधान आहे. नवी पिढीदेखील संगीत ऐकण्यासाठी महोत्सवात गर्दी करत असल्याचे पाहूनदेखील आनंद होत आहे.- ज्योती मानकर, महिला बाऊन्सर्स''