पालकमंत्रिपदावरून रायगडमध्ये होणारे वाद अयोग्य; नाराजी व्यक्त करण्याची पद्धत चुकीची - रुपाली चाकणकर

By राजू इनामदार | Updated: January 20, 2025 17:35 IST2025-01-20T17:34:15+5:302025-01-20T17:35:10+5:30

आदिती तटकरे यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी रायगडचे पालकमंत्री पद दिले. त्यावरून तिथे कोणी नाराज असेल, तर नाराजी व्यक्त करण्याची पद्धत चुकीची

The controversy in Raigad over the guardian ministership is inappropriate; The method of expressing displeasure is wrong - Rupali Chakankar | पालकमंत्रिपदावरून रायगडमध्ये होणारे वाद अयोग्य; नाराजी व्यक्त करण्याची पद्धत चुकीची - रुपाली चाकणकर

पालकमंत्रिपदावरून रायगडमध्ये होणारे वाद अयोग्य; नाराजी व्यक्त करण्याची पद्धत चुकीची - रुपाली चाकणकर

पुणे : रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती.  तेसच शिवसैनिकांनी आक्रमक होत आंदोलन केले होते. अनेकांनी तर राजीनामेही दिले. हा निर्णय मला धक्कादायक वाटतो. आम्हाला ही अपेक्षा नव्हती. मी वरिष्ठांना फोन केला होता. मात्र, याबाबत माझी त्यांच्याशी काही चर्चा झालेली नाही. पालकमंत्री म्हणून माझी निवड व्हावी असं संपूर्ण रायगड जिल्ह्यात वातावरण झालेलं होतं असं म्हणत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर रुपाली चाकणकर यांनी भाष्य केलं आहे. 

पालकमंत्रिपदावरून रायगडमध्ये होत असलेले वाद अयोग्य आहेत. आदिती तटकरे यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी रायगडचे पालकमंत्री पद दिले. त्यावरून तिथे कोणी नाराज असेल, तर नाराजी व्यक्त करण्याची पद्धत चुकीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या जिल्ह्यात अशी भाषा वापरली गेली, त्याचा मी निषेध करते, अशा शब्दांमध्ये चाकणकर यांनी आपले मत व्यक्त केले.

पक्षाच्या शिर्डी येथील दोन दिवसांच्या अधिवेशनानंतर पुण्यात आलेल्या चाकणकर यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. राज्य महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून आपण राज्यातील महिला अत्याचाराच्या सर्व घटनांची दखल घेत असते. मेळघाटमधील वृद्ध महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत तेथील पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक झाली आहे. एक समिती स्थापन करून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आयोगाला द्यावा असे त्यांना सांगितले आहे. अशा घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित नाही असे म्हणता येणार नाही. विरोधकांकडून असे आरोप केले जातात. पराभवामुळे त्यांना नैराश्य आले आहे, असे चाकणकर म्हणाल्या.

संजय राऊत यांचे बोलणे राज्यात कोणीही गंभीरपणे घेत नाही. त्यांनी स्वत:च्या पक्षात काय सुरू आहे ते पाहावे, अशी टीका त्यांनी केली. छगन भुजबळ, धनंजय मुंडे अधिवेशनात उपस्थित होते. ते दोघेही मोठे नेते आहेत. अधिवेशनानंतर ते काय बोलले मला माहिती नाही. त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही. महायुतीमध्ये तीनही पक्षांच्या प्रमुखांमध्ये चांगला संवाद आहे. सर्व निर्णय चर्चा करूनच घेतले जातात. त्यामुळे मतभेद आहेत या म्हणण्याला काही अर्थ नाही, असा दावा चाकणकर यांनी केला. पुढील पाच वर्षांचा विचार करून पक्ष संघटनेत काही बदल करण्याचे सूतोवाच पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केले, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: The controversy in Raigad over the guardian ministership is inappropriate; The method of expressing displeasure is wrong - Rupali Chakankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.