थंडी वाढली अन् हवा बिघडली; पुणेकरांना सर्दी, घसा आणि खोकल्याचा ताप, ८ ते ११ अंशांपर्यंत तापमान घसरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:49 IST2025-12-20T12:48:35+5:302025-12-20T12:49:41+5:30
धुळीपासून बचावासाठी मास्कचा वापर करणे, थंड पदार्थ टाळणे, गरम पाण्याची वाफ घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे उपयुक्त ठरते

थंडी वाढली अन् हवा बिघडली; पुणेकरांना सर्दी, घसा आणि खोकल्याचा ताप, ८ ते ११ अंशांपर्यंत तापमान घसरले
पुणे: शहरात गेल्या आठ दिवसांपासून हवामानात अचानक आणि तीव्र बदल जाणवत आहेत. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री बोचरी थंडी असा दुहेरी अनुभव पुणेकर घेत आहेत. सध्या शहरात कमाल तापमान साधारण २८ ते ३० अंश सेल्सिअसदरम्यान असून, किमान तापमान ८ ते ११ अंशांपर्यंत घसरले आहे. काही दिवस रात्रीचे तापमान एकल अंकी किंवा त्याच्या आसपास राहिल्याने थंडीचा प्रभाव अधिक जाणवू लागला आहे.
या बदलते हवामान आणि वातावरणातील धूळ, धुके व वाढते प्रदूषण यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप तसेच श्वसनाच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना सर्दी, घसा खवखवणे, कोरडा खोकला, दम लागणे आणि अंगदुखीची समस्या जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेचे दवाखाने, रुग्णालये, ससून सर्वोपचार रुग्णालय, तसेच खासगी दवाखान्यांच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. वाढती थंडी, बिघडलेले हवामान आणि प्रदूषण यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असून योग्य काळजी, संतुलित आहार, स्वच्छता आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतल्यास या आजारांपासून बचाव करणे शक्य असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.
लहान बालकांवर अधिक परिणाम
हवामानातील अचानक बदलांचा सर्वाधिक फटका लहान बालकांना बसत आहे. प्रतिकारशक्ती कमी असल्याने बालकांना सर्दी, खोकला, ताप व श्वसनास त्रास होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पालकांनी बालकांना गरम कपडे घालणे, थंड हवा व धुळीचा संपर्क टाळणे आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
लहान मुलांना गरम पाणी, घरचे ताजे व पौष्टिक अन्न द्यावे. सर्दी-खोकल्याची लक्षणे वाढत असल्यास स्वतःहून औषधे न देता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ताप दीर्घकाळ राहिल्यास किंवा श्वसनास त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नये. - डॉ. स्मिता सांगडे, बालरोगतज्ज्ञ, कमला नेहरू रुग्णालय.
प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांमध्येही तक्रारी
हवामानातील चढ-उतार आणि प्रदूषणामुळे प्रौढ व वयोवृद्ध नागरिकांमध्येही सर्दी, खोकला, घसा दुखणे आणि श्वसनाचे आजार वाढले आहेत. दमा, ॲलर्जी, मधुमेह किंवा हृदयविकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
धुळीपासून बचावासाठी मास्कचा वापर करणे, थंड पदार्थ टाळणे, गरम पाण्याची वाफ घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे उपयुक्त ठरते. घसा दुखणे किंवा आवाज बसणे यांसारख्या तक्रारी वाढल्यास वेळेवर उपचार घेणे महत्त्वाचे आहे. - डॉ. राहुल ठाकूर, ईएनटी तज्ज्ञ, ससून.
----------------
तापमान व हवा गुणवत्ता चिंताजनक
मागील आठ दिवसांत पुण्यात किमान तापमान ७.९ ते १०.९ अंशांदरम्यान राहिले असून काही दिवस एकअंकी तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम ते ‘अत्यंत खराब’ स्तरापर्यंत पोहोचला. काही ठिकाणी निर्देशांक ३०० च्या पुढे गेल्याने प्रदूषणाचा धोका अधिक वाढल्याचे दिसून आले.
शहरातील मागील ८ दिवसांचे कमाल व किमान तापमान
दिनांक कमाल तापमान (अंश सेल्सिअस) किमान तापमान (अंश सेल्सिअस)
१० डिसेंबर - २९.२ - ८.४
११ डिसेंबर - २८.७ - ७.९
१२ डिसेंबर - २९.० - ८.३
१३ डिसेंबर - ३०.४ - ८.८
१४डिसेंबर - २९.२ - ९.४
१५ डिसेंबर - २८.२ - ९.०
१६ डिसेंबर - २८.६ - ९.४
१७डिसेंबर - २९.८ - १०.९
शहरातील मागील ८ दिवसांतील हवा गुणवत्तेची आकडेवारी (निर्देशांक)
दिनांक / कालावधी - निर्देशांक स्तर - खराब
१० डिसेंबर (संध्याकाळ) -११६ - निर्देशांक किमान (चांगला)
११–१३ डिसेंबर -१३० - मध्यम ते ‘संवेदनशील गटांसाठी अनारोग्यकारक’
१४ डिसेंबर -१३२ - (दुपारनंतर २.५ उच्च) खालावलेली
१५ डिसेंबर - २१५ - खराब निर्देशांक ‘खालावलेला’, काही ठिकाणी ‘खूप खालावलेला’
१६ डिसेंबर (सकाळी) - २००.८ - उच्च प्रदूषण
१७ डिसेंबर (मध्यरात्र) -११५.९ - निर्देशांकात थोडा सुधार
१८ डिसेंबर / सकाळी - ३२४ - अत्यंत खराब / घातक