पुण्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणाचा कोडवर्ड आला समोर, पाच महिन्यांपासून सुरू होता उद्योग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 17:35 IST2024-02-21T17:33:30+5:302024-02-21T17:35:10+5:30
कुरकुंभ एमआयडीसी येथील एका कारखान्यात तयार होत असलेल्या ड्रग्जला एक कोडवर्ड देण्यात आला होता...

पुण्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणाचा कोडवर्ड आला समोर, पाच महिन्यांपासून सुरू होता उद्योग
- किरण शिंदे
पुणे : कुरकुंभ एमआयडीसीत मंगळवारी (२० फेब्रुवारी) पुणे शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली. यावेळी तब्बल ११०० कोटी रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले होते. कुरकुंभ एमआयडीसी येथील एका कारखान्यात तयार होत असलेल्या ड्रग्जला एक कोडवर्ड देण्यात आला होता. एमडी ड्रग्स बनवायच्या फॅार्म्युलाचा कोड वर्ड "न्यू पुणे जॅाब" होता.
कुरकुंभ येथील असणाऱ्या अर्थकेम कारखान्यात एमडी ड्रग्ज तयार केले जात होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुरकुंभ येथे केलेल्या कारवाईत ६५० किलो एमडी जप्त केले. ज्याची किंमत तब्बल ११०० कोटी आहे. "न्यू पुणे जॅाब" ची जबाबदारी आरोपी युवराज भुजबळवर होती. भुजबळ हा केमिस्ट्री विषयातील पीएचडी धारक असून त्याला डोंबिवली मधून अटक करण्यात आली. त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कुरकुंभमध्ये ॲाक्टोबर २०२३ पासून एम डी ड्रग्जची निर्मिती सुरू होती. अँटी मलेरिया ड्रग कंपोनंट आणि ॲंटीरस्ट हे २ रसायन कुरकुंभमधील कारखान्यात तयार होत होते. पुणे शहर पोलिस दलाने गेल्या दोन दिवसात विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे केलेल्या कारवाई करुन तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे ११०० किलोपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. गुन्हे शाखेच्या एका पथकाने दिल्लीत कारवाई करुन ४०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहेत.