सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या ६९ व्या स्वरयज्ञाला उद्यापासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 10:32 PM2023-12-12T22:32:21+5:302023-12-12T22:32:58+5:30

महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतो.

The 69th Swarayagna of the Sawai Gandharva Bhimsen Festival begins tomorrow | सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या ६९ व्या स्वरयज्ञाला उद्यापासून सुरुवात

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या ६९ व्या स्वरयज्ञाला उद्यापासून सुरुवात

पुणे: पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात अतिशय मानाचे स्थान असलेल्या ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी (दि.१३) दुपारी ३ वाजता सवाईच्या सांगीतिक स्वरयज्ञाला तुकाराम दैठणकर आणि सहकारी यांच्या मंगलमय सनईवादनाने सुरुवात होईल. दरवर्षी देश विदेशातून शास्त्रीय संगीताचे हजारो चाहते या महोत्सवाला भेट देतात. महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतो. 

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल या ठिकाणी १३ ते १७ डिसेंबर दरम्यान महोत्सव रंगणार असून कार्यक्रमस्थळी भव्यदिव्य अशा मांडवाची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली. 

दैठणकरांनंतर पं. श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य व किराणा घराण्याचे गायक संजय गरुड आपली गायनसेवा सादर करतील. पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत त्यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांचे गायन होईल. यानंतर सुप्रसिद्ध सरोदवादक तेजेंद्र नारायण मजुमदार यांचे सुमधुर सरोदवादन संपन्न होईल. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता सुपरिचित गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल

यावर्षी पं. कुमार गंधर्व, पं. राम मराठे आणि पं. सी. आर. व्यास यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या तीनही दिग्गज कलाकारांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने त्यांच्या परंपरेतील कलाकार यावर्षी महोत्सवात आपली सेवा रुजू करतील.

महोत्सवासाठी येणा-या रसिकांच्या दुचाकी व चारचाकी गाड्यांसाठी सुसज्ज पार्किंग, कार्यक्रमाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता यावा यासाठी नेहमीप्रमाणे मोठ्या एलईडी स्क्रीन्स, अल्पोपहाराची सोय असणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आदी सुविधा महोत्सवाच्या ठिकाणी असणार आहेत. शिवाय मंडपाच्या एका बाजूस संगीत क्षेत्राशी संबंधित विविध उत्पादनांचे तर एका बाजूला प्रायोजकांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. पुरुष व महिलांसाठी अद्ययावत असे प्रसाधनगृहे मंडपाच्या मागील बाजूस उभारण्यात आली आहेत. पीएमपीएमएल तर्फे कार्यक्रम संपल्यानंतर विशेष बससेवा संगीत रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे जोशी यांनी नमूद केले.

Web Title: The 69th Swarayagna of the Sawai Gandharva Bhimsen Festival begins tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे