'त्या' V रांगेवरून काहीतरी गैरसमज झाला असेल; शरद पवारांचा पडदा टाकण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 15:23 IST2019-06-06T15:22:35+5:302019-06-06T15:23:16+5:30
शरद पवार हे 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले होते.

'त्या' V रांगेवरून काहीतरी गैरसमज झाला असेल; शरद पवारांचा पडदा टाकण्याचा प्रयत्न
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथ सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठक व्यवस्थेवरून झालेल्या वादावर आता स्वतः पवार यांनीच पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पासवरून काहीतरी गैरसमज झाला झाला असेल, तो वादाचा मुद्दा नाही, विसरायला हवा अशी प्रतिक्रिया देत त्यांनी हा विषय संपल्याचे जाहीर केले.
शरद पवार हे 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले होते. राजधानी दिल्लीत जाऊनही त्यांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.पवार यांना पाचव्या रांगेचा पास दिला गेल्यानं ते शपथविधी सोहळ्याला गेले नाहीत, असा दावा करण्यात येत होता.
मोदी सरकारने पवारांचा अपमान केला, महाराष्ट्राचा अवमान केला, अशा प्रतिक्रियाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोशल मीडियावर व्यक्त करत होते. परंतु, या दाव्यात काही तथ्य नसल्याचं राष्ट्रपती भवनकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. पवारांना देण्यात आलेला V पास म्हणजे VVIP मधील V होता, असे राष्ट्रपती भवनचे माध्यम सचिव अशोक मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. या विषयावर पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. पुण्याजवळील भोसरी येथील राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले की, ' इतक्या मोठ्या कार्यक्रमाच्या आधी ऐनवेळी गोंधळ उडू नये म्हणून माझी बैठक व्यवस्था, गाडीची पार्किंग याबाबतच्या चौकशीसाठी माझे सचिव गेले होते. तेव्हा दोनही वेळा त्यांना तेव्हापाचवी रांग असल्याचे सांगण्यात आले. मात्र हा फार म्हटल्याचा मुद्दा नाही. काहीतरी गैरसमज झाला असावा. त्यांच्या किंवा माझ्या कार्यालयाची कमतरता असू शकते, पण हा काही महत्वाचा प्रश्न नाही. विसरायला हवा' .