‘त्या’ महिलेचा गळा घोटून झाला होता खून; मांजरी रेल्वेस्थानक परिसरात आढळला होता मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 10:57 IST2024-04-10T10:56:54+5:302024-04-10T10:57:24+5:30
मांजरी रेल्वेस्थानक परिसरात मांजराई व्हिलेज सोसायटीजवळ एक अनोळखी महिला शनिवारी (दि. ६) मृतावस्थेत सापडली...

‘त्या’ महिलेचा गळा घोटून झाला होता खून; मांजरी रेल्वेस्थानक परिसरात आढळला होता मृतदेह
पुणे : हडपसर परिसरातील मांजरी रेल्वेस्थानकाच्या परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. शवविच्छेदन अहवालात महिलेचा गळा दाबून खून झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही महिला कोण आणि तिचा खून कोणी केला, याच्या तपासाची चक्रे फिरविली जात आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मांजरी रेल्वेस्थानक परिसरात मांजराई व्हिलेज सोसायटीजवळ एक अनोळखी महिला शनिवारी (दि. ६) मृतावस्थेत सापडली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक गिते यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतावस्थेत सापडलेल्या महिलेची ओळख पटली नाही. पोलिसांनी ससून रुग्णालयात महिलेचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवालात महिलेचा गळा दाबून खून झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. महिलेची ओळख पटलेली नाही. पोलिस निरीक्षक गिते तपास करत आहेत.