भीमाशंकर परिसरासाठी वरदान ठरलेला तेरुंगण पाझर तलाव शंभर टक्के भरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 13:44 IST2025-08-03T13:15:51+5:302025-08-03T13:44:32+5:30
श्री क्षेत्र भीमाशंकरसह आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांना यामुळे मोठा दिलासा मिळाला

भीमाशंकर परिसरासाठी वरदान ठरलेला तेरुंगण पाझर तलाव शंभर टक्के भरला
तळेघर : श्री क्षेत्र भीमाशंकर आणि परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारा तेरुंगण (ता. आंबेगाव) येथील पाझर तलाव यंदा शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकरसह आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या वर्षी कमी पावसामुळे या पाझर तलावात पाण्याची कमतरता जाणवली होती. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याने आदिवासी बांधवांना, विशेषतः महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल वणवण भटकावे लागले होते. मात्र, यंदा गेल्या महिनाभरापासून मुसळधार पावसामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही मोठा फायदा होणार आहे.
तेरुंगण येथील हा पाझर तलाव आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील एक महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. श्री क्षेत्र भीमाशंकरला येणाऱ्या भाविक, भक्त, पर्यटक आणि निसर्गप्रेमींच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेसह निगडाळे, तेरुंगण, म्हतारबाचीवाडी, पालखेवाडी, ढगेवाडी आणि भीमाशंकर या गावांचा पाणीप्रश्न कायमचा मिटला आहे. गेल्या वर्षी तलाव ८० टक्केच भरला होता, परंतु यंदाच्या मुसळधार पावसामुळे तो पूर्णपणे भरला असून, ओसंडून वाहत आहे.
या तलावाच्या निर्मितीसाठी २०११ मध्ये राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांतून ४ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. छोट्या पाटबंधारे विभागाने हे काम पूर्ण केले असून, यामुळे आदिवासी बांधवांची पाण्यासाठीची वणवण थांबली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सततच्या पावसामुळे हा परिसर हिरवळीने नटला असून, श्री क्षेत्र भीमाशंकरला येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांसाठी हा नजारा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.