वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न; धायरी येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 15:27 IST2020-03-06T12:36:25+5:302020-03-06T15:27:11+5:30
टोळक्याने दहशत माजवित तीन कार व एका स्कार्पिओ या चार वाहनांच्या काचा फोडल्या.

वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न; धायरी येथील प्रकार
धायरी : चार वाहनांची तोडफोड करीत दहशत माजवण्याचा प्रयत्न एका टोळक्याने केला आहे. हा प्रकार धायरी येथील धायरेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये शुक्रवारी रात्री( दि.६) एकच्या सुमारास घडला.
धायरी येथील धारेश्र्वर मंदिराच्या परिसरात एका टोळक्याने दहशत माजवित तीन कार व एका स्कार्पिओ या चार वाहनांच्या काचा फोडल्या. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले असून तरुणांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणांनी दारू पिऊन हे कृत्य केले असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून सिंहगड रस्ता परिसरात सुरू असलेले वाहन तोडफोडीचे सत्र काही केल्याने थांबण्याचे नाव घेत नाही. फेब्रुवारी महिन्यातच वडगांव बुद्रुक येथील तुकाई नगर परिसरात वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवीत गोळीबार केल्याची घटना घडली होती. सिंहगड रस्ता परिसरात पुन्हा टोळक्यांचा वाद निर्माण होऊन वाहने तोडफोडीचे सत्र दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशा तरुणांना पोलिसांनी वेळीच जरब बसविणे गरजेचे असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले. याबाबत अधिक माहितीसाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चार वाहनांची तोडफोड झाली असल्याचे सांगितले.