पुणे : दहशत माजवण्यासाठी वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडाला येरवडापोलिसांनीअटक केली. समीर शब्बीर शेख (२७, रा. जयजवाननगर, येरवडा), असे अटक केलेल्याचे नाव आहे. शेख हा सराईत असून, त्याच्याविरोधात यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका), झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली होती.
मकोका कारवाईत न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर झाल्यानंतर तो पुन्हा येरवडा भागात आला. त्याने दहशत माजवण्यासाठी वाहनांची तोडफोड केल्याची नुकतीच घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. शेख याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. पसार झालेला शेख हा लोहगाव भागात मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अमोल गायकवाड यांना खबऱ्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून शेख याला पकडले. दहशत माजवणे, तसेच एकाबरोबर झालेल्या भांडणातून वाहनांची तोडफोड केल्याची कबुली त्याने दिली.
परिमंडळ ४चे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक विजय फटांगरे, प्रदीप सुर्वे, महेंद्र शिंदे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, नटराज सुतार, अतुल जाधव, अक्षय शिंदे आणि संदीप जायभाय यांनी ही कामगिरी केली.