वासुंदे (दौंड) : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील वासुंदे (ता दौंड) येथील उड्डाण पुलावर भरधाव चारचाकी दुभाजकाजकावर चढून पुलाच्या कठड्याला धडकल्याने झालेल्या अपघात आज सोमवार दि ३० रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडला. या घटनेत एक महिला व पुरुष अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव स्वीफ्ट गाडी पाटसच्या बाजूने बारामती कडे जात होती. वासुंदे येथील उड्डाण पुलावरील दुभाजकावर एक चाक चढले. तशीच अंदाजे १०० फुट अंतरापर्यंत गाडी दुभाजकावरुन पुढे गेली व मध्यभागी असलेल्या पुलाच्या कठड्याला धडकून रस्त्यावर पडली. यावेळी मोठा आवाज झाला. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढून महामार्ग रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी बारामती येथे पाठवले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचे निधन झाले. पुढील कार्यवाही सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल बारामती येथे सुरू आहे. दरम्यान अद्याप या घटनेची दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल नसून मृत विवाहिता ही पाटस ता दौंड येथील व मृत व्यक्ती ही चिंचणी ता शिरूर येथील हॉटेल व्यावसायिक असल्याचे बोलले जात आहे.
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 18:32 IST