दहा वर्षांनंतर देखील ' जर्मन बेकरी ' बॉम्बस्फोट प्रकरणातले चार आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 04:18 PM2020-02-13T16:18:19+5:302020-02-13T16:54:39+5:30

कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीमध्ये १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी जोरदार धमाका झाला.

Ten years later four accused in the German Bakery bomb blast case are still absconding | दहा वर्षांनंतर देखील ' जर्मन बेकरी ' बॉम्बस्फोट प्रकरणातले चार आरोपी फरार

दहा वर्षांनंतर देखील ' जर्मन बेकरी ' बॉम्बस्फोट प्रकरणातले चार आरोपी फरार

googlenewsNext
ठळक मुद्देया बॉम्बस्फोटात १७ जणांचा मृत्यु झाला तर ५६ जण झाले होते जखमी मृतांमध्ये ५ व जखमींमध्ये १० परदेशी नागरिकांचा समावेश इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक यासीन भटकळला आयबी आणि रॉ कडून नेपाळच्या सीमेवर अटक कडून यासीन भटकळ सध्या तिहार तुरुंगात

पुणे : शांत शहर म्हणून देशभरातील पुणे शहराचा लौकिक पुसून टाकणाऱ्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला आज ( दि. १३) १० वर्षे पूर्ण होत आहे. मात्र, या बॉम्बस्फोटातील सातपैकी चार आरोपी अद्याप फरारी आहेत. कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीमध्ये १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी जोरदार धमाका झाला. सुरुवातीला हा हॉटेलमधील कशाचा तरी स्फोट असल्याचे लोकांना वाटले. पण, काही मिनिटातच पुणे शहराच्या लौकिकाला काळिमा फासणारा असा हा बॉम्बस्फोट झाल्याचे लक्षात आले. या बॉम्बस्फोटात १७ जणांचा मृत्यु झाला तर ५६ जण जखमी झाले होते. मृतांमध्ये ५ व जखमींमध्ये १० परदेशी नागरिकांचा समावेश होता. 
जर्मन बेकरीमधील बॉम्बस्फोटात आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता़ इंडियन मुजाहिद्दीन या बंदी असलेल्या संघटनेच्या देशव्यापी कटाच्या भागातील हा एक बॉम्बस्फोट असल्याचे तपासात निष्पन्न झाले. 
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात एटीएसने मिर्झा हिमायत बेग याला अटक केली. त्याच्याविरुद्ध खटला चालविण्यात आला़.या खटल्यात एटीएसने बेगसह सात जणांवर दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यात मोहसीन चौधरी, यासिन भटकळ, रियाझ भटकळ, इक्बाल भटकळ, फय्याज कागझी, जबुउद्दीन अन्सारी ऊर्फ अबु जुंदाल यांचा समावेश होता. पुण्यातील सत्र न्यायालयाने १८ एप्रिल २०१३ रोजी बेग याला १६ विविध कलमाखाली जन्मठेपेसह फाशीची शिक्षा दिली होती. त्यानंतर १५ सप्टेंबर २०१३ रोजी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक यासीन भटकळ याला इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि रॉ यांनी नेपाळच्या सीमेवर अटक केली. यासीनच्या अटकेनंतर बेग याने या गुन्ह्याचा पुन्हा तपास करण्याची मागणी केली होती. दरम्यान, जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात हिमायत बेगचा संबंध नसल्याचा दावा करीत यासीनने या बॉम्बस्फोटातील सहभागाची कबुली दिली होती. उच्च न्यायालयाने जर्मन बेकरी खटल्यात १७ मार्च २०१६ रोजी बेगची फाशीची शिक्षा रद्द केली. मात्र, आरडीएक्स बाळगले व बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या दोन आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 
यासीन भटकळ याचा एटीएसकडे १३ मार्च २०१४ला ताबा दिला होता. त्यानंतर भटकळ याला वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यात वर्ग करुन घेतले आहे. गेल्या वर्षी यासीन याला पुण्यातील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्यावर दोषारोप निश्चित करण्यात आले. मात्र, त्यानंतर या प्रकरणी अद्याप सुनावणी झालेली नाही. यासीन भटकळ सध्या तिहार तुरुंगात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला न्यायालयातील तारखांना हजर करणे शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे या खटल्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फसिंगद्वारे करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 
..........
फरारी आरोपी देशाबाहेर
या खटल्यातील रियाझ भटकळ, मोहसीन चौधरी, इक्बाल भटकळ, फय्याज कागझी हे सर्व आरोपी भारताबाहेर रहात असल्याचा दावा तपास यंत्रणांकडून केला गेला आहे. त्यांना पुणे न्यायालयाने फरार घोषित केले आहे. जबुउद्दीन अन्सारी याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केले आहे. मात्र, त्याला अजूनही या खटल्यात वर्ग करुन घेण्यात आलेले नाही.


 
 

Web Title: Ten years later four accused in the German Bakery bomb blast case are still absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.