दिवाळीत रेल्वेत सापडले साडेदहा हजार फुकटे; प्रशासनाकडून १ कोटी १४ लाखांहून अधिक दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:16 IST2025-11-01T12:16:27+5:302025-11-01T12:16:41+5:30
नोकरी, व्यवसाय आणि कामानिमित्त पुण्यात बाहेरील राज्यातील राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे

दिवाळीत रेल्वेत सापडले साडेदहा हजार फुकटे; प्रशासनाकडून १ कोटी १४ लाखांहून अधिक दंड वसूल
पुणे : दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. यामुळे रेल्वे प्रशासनाकडून विभागातील प्रमुख स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी पथकाची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, दिवाळीच्या दि. १७ ते २७ ऑक्टोबर या ११ दिवसांत रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या १० हजार ६०३ फुकट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ९१ लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे.
नोकरी, व्यवसाय आणि कामानिमित्त पुण्यात बाहेरील राज्यातील राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. दिवाळीत गावी जाऊन सण साजरा करणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. यामुळे रेल्वेला प्रचंड गर्दी असते. अशा वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. यामुळे रेल्वे प्रशासनाकडून पुणे विभागातील पुणे, सातारा, कऱ्हाड, मिरज, कोल्हापूर, अहिल्यानगर या सर्व प्रमुख स्थानकांवर तिकीट तपासणी पथकांची नेमणूक करण्यात आली होती. शिवाय लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये तिकीट तपासनिसांची संख्या वाढविण्यात आली होती. यामुळे गेल्या ११ दिवसांत पुणे रेल्वे विभागात १० हजारांहून अधिक फुकटे प्रवासी सापडले आहेत. गर्दीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र दंडात्मक कारवाई झाल्यामुळे दणका बसला आहे.
तिकीट जनरल; प्रवास आरक्षित डब्यातून
अनेक प्रवासी आरक्षित तिकिटाचे दर जास्त असल्याने जनरल तिकीट काढतात; परंतु प्रवास मात्र आरक्षित डब्यातून करतात. अशा प्रकारे प्रवास करणे चुकीचे आहे; परंतु प्रवाशांच्या या चुकीमुळे रेल्वे पथकांकडून कारवाई करण्यात येते. दिवाळीच्या काळात ११ दिवसांत असे जनरल तिकीट काढून आरक्षित डब्यांतून प्रवास करणाऱ्या तीन हजार ३५० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २३ लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. शिवाय रेल्वेतून जास्तीचे सामान घेऊन जाणाऱ्या ७८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १० हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
अशी आहे कारवाईची आकडेवारी
विनातिकीट प्रवासी : १०६०३
जनरल तिकीट काढून आरक्षित डब्यातून प्रवास : ३३५०
जास्तीचे समान घेऊन जाणे : ७८
एकूण प्रवाशांवर कारवाई : १४०३१
एकूण दंड वसूल : १,१४,५८,४२०
गर्दीची संधी साधून अनेक प्रवासी फुकट प्रवास करताना आढळतात. त्यामुळे विभागातील प्रमुख स्थानकांवर विशेष तिकीट तपासणीस नेमण्यात आले होते. गेल्या ११ दिवसांत १० हजारांहून अधिक फुकटे प्रवासी सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. दिवाळीत एकूण १४ हजारांहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आले आहे. - हेमंतकुमार बेहेरा, वाणिज्य व्यवस्थापक, पुणे.