गणपतीत मोठी कामगिरी, मंडळांकडून देखावे करत दखल; पण दबंग अधिकारी संदीपसिंग गिल यांची बदली
By नितीश गोवंडे | Updated: September 5, 2024 22:08 IST2024-09-05T22:05:34+5:302024-09-05T22:08:05+5:30
-तेजस्वी सातपुते नव्या पोलिस उपायुक्त

गणपतीत मोठी कामगिरी, मंडळांकडून देखावे करत दखल; पण दबंग अधिकारी संदीपसिंग गिल यांची बदली
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे :पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुंबई येथील पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती केली आहे. याचे आदेश गृह विभागाकडून गुरुवारी (दि. ५) देण्यात आले. ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबई येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. यासह राज्यातील १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शहरातील कोयता गँगचा बीमोड करण्यासाठी गिल यांनी केलेली कामगिरी, गेल्यावर्षी गणेशोत्सवादरम्यान त्यांनी केलेले नियोजन हे पुणेकरांसाठी चर्चेचा विषय ठरले होते.
नोव्हेंबर २०२२ मध्ये गिल्ल यांची पुण्यात उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. शहराचा ह्रदय समजल्या जाणार्या मध्यभाग आणि पेठांचा परिसर असणार्या परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी त्यांची नियुक्त करण्यात आली होती. गणेशोत्सव काळात परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त हे अतिशय महत्त्वाचे पद समजले जाते. गणेशोत्सवात त्यांनी केलेले कामकाज कौतुकास्पद होते. मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवात संदीप गिल्ल यांच्या नावाने देखावे लागले होते. परिमंडळ १ मध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. मितभाषी अधिकारी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. पुण्यात काम करताना गिल्ल हे दबंग अधिकारी म्हणून ओळखले जात होते.