Jhelum Express: नातेवाईकांना पाहून रडू कोसळले; झेलम एक्स्प्रेसने २०० पर्यटक पुण्यात परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 21:00 IST2025-04-25T20:59:51+5:302025-04-25T21:00:17+5:30
पुण्यातील अनेक पर्यटकांचे जम्मू तावी एक्स्प्रेस या रेल्वे गाडीत बुकींग होते, ते पर्यटक गुरुवारी झेलम एक्स्प्रेसने पुण्याला रवाना झाले होते

Jhelum Express: नातेवाईकांना पाहून रडू कोसळले; झेलम एक्स्प्रेसने २०० पर्यटक पुण्यात परतले
पुणे: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांची हत्या करण्यात आली. जगभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. या घटनेनंतर जम्मू काश्मीर, श्रीनगर भागात फिरायला गेलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्मण झाले आहे. आपल्या घरी परतण्यासाठी ते सगळे धडपड करू लागले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर येथे फिरायला गेले पर्यटक आपल्या गावी मिळेल त्या मार्गाने परत येत आहेत. शुक्रवारी दुपारी चार वाजता झेलम एक्स्प्रेसने २०० पर्यटक पुण्यात परतले. यावेळी त्यांचे नातेवाईक भावनिक झाले होते. तसेच आलेल्या पर्यटकांचे नातेवाइकांकडून स्वागत करण्यात आले.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. शिवाय पावसामुळे रामबन श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला होता. त्यामुळे अनेक पर्यटक अडकून पडले होते. अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष विमानाची सोय केली होती. त्यापैकी पहिले विमान विशेष गुरुवारी दाखल झाले होते. तर, दुसरे विमान शुक्रवारी आले. पुण्यातील अनेक पर्यटकांचे जम्मू तावी एक्स्प्रेस या रेल्वे गाडीत बुकींग होते. ते पर्यटक गुरुवारी झेलम एक्स्प्रेसने पुण्याला रवाना झाले होते. झेलम एक्स्प्रेस ही शुक्रवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाली. त्यावेळी सर्व प्रवाशांचे चेहरे आनंदाने फुलले होते. त्यांना घेण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना पाहून काहींनी रडू देखील कोसळले. तसेच नातेवाइकांना घेऊन जाण्यासाठी अनेक जण रेल्वे स्थानकात गर्दी केली होती.