शिरूर तालुक्यात गळफास घेत शिक्षकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 15:37 IST2018-05-16T15:37:46+5:302018-05-16T15:37:46+5:30
बारामती येथे कॉलेजवर प्राध्यापक म्हणुन नोकरीला असलेलय शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

शिरूर तालुक्यात गळफास घेत शिक्षकाची आत्महत्या
रांजणगाव सांडस : शिरसगाव काटा (ता.शिरुर) येथे शिक्षकाने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१६) रोजी सकाळी उघडकीस आली. बाळकृष्ण धारबापु कोळपे (वय ४७ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
याबाबत आण्णा यशवंत कोळपे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आण्णा कोळपे हे बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना बाळकृष्ण यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला असल्याचे दिसुन आल्याचे सांगितले. बाळकृष्ण हा विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे कॉलेजवर प्राध्यापक म्हणुन नोकरी करत होता. तेथेच पत्नी व एक मुलगा यांच्यासह राहत होते. सध्या कॉलेजला सुट्टी असल्यामुळे गावी आले होते.त्यांना पोटदुखीचा त्रास होता. दोन दिवसांपुर्वी हंगेवाडी (ता.श्रीगोंदा) येथे उपचार घेतले होते. त्यानंतर पुण्यात उपचार घेण्यासाठी जाणार होते. त्यामुळे पोटदुखीच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास मांडवगण पोलीस चौकीचे पोलीस हवालदार आबा जगदाळे हे करत आहेत. मयत बाळकृष्ण हे शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती दादा कोळपे यांचे बंधु होते.