Teacher innovate new underwater Yoga technic in Chakan near Pune | वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने घेतला 'असा ' ध्यास, की सारेच म्हणतील शाब्बास !
वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने घेतला 'असा ' ध्यास, की सारेच म्हणतील शाब्बास !

पुणे : राखेतून भरारी घेणाऱ्याला फिनिक्स म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आयुष्यात आलेला एखादा वाईट प्रसंग बदलणं शक्य नसलं तरी त्यातून धडा घेऊन जो पुढे जातो त्याची दखल समाजही घेतो. अशीच गोष्ट आहे पुण्याजवळील बापूसाहेब सोनवणे यांची. पोहण्यात तरबेज असणाऱ्या सोनावणे यांच्या वडिलांचा बुडून मृत्यू झाला. त्या धक्क्यामुळे कोसळून न जाता त्यांनी घेतला पाण्याची भीती घालवण्यास ध्यास आणि शोधला नवा योगासनांचा प्रकार अर्थात पाण्यातील योगा. 

 सोनवणे हे चाकण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. कोणत्याही गोष्टीत एकदा रस निर्माण झाला की ती पूर्ण आत्मसात करायची हा त्यांचा स्वभावच आहे. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. पट्टीचे पोहणारे आपले वडील पाण्यात बुडून गेले या धक्क्यात त्यांनी आयुष्याची काही वर्षे काढली. पण त्यानंतर मात्र त्यांना सापडली एक वेगळी दिशा. आपल्यासारखी वेळ कोणावर येऊ नये म्हणून त्यांनी सुरुवातीला अनेकांना पोहणे शिकवायला सुरुवात केली. एकीकडे त्यांचे अनेक विद्यार्थी पाण्याशी मैत्री करत असताना त्यांना पाण्याची भीती वाटणाऱ्यांची चिंता होती. चराचरात असणारे पाणी जसे जीवन म्हणून ओळखले जाते तसेच ते बुडवतेही ते त्यांना माहिती होते. आणि म्हणून त्यांनी योगासने करून पाण्यात काही मिनिट नाही तर कितीही वेळ थांबता येईल असे काही प्रकार शोधून काढले. 

श्वासावर नियंत्रण असेल तर कोणत्याही व्यक्तीला यातून स्वतःचा जीव वाचवणे आणि पाण्याची भीती घालवणे शक्य आहे. त्यांनी स्वतःसोबत इयत्ता नववीत असणारा त्यांचा मुलगा अथर्वही हे सगळे आसन प्रकार लीलया करतो. त्यांचे हे आसनांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत. पाण्याची भीती वाटणाऱ्या कोणालाही ते विनामूल्य हे शिक्षण देतात. 

या सगळ्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, 'पाण्यात तगून राहणे हा सवयीचा भाग आहे. हात-पाय जड झाल्यावर किंवा थकल्यावर पट्टीचे पोहणारेही बुडून जीवाला मुकतात. त्यावर अनेक वर्ष अभ्यास करून, गुरुत्वाकर्षणाचा वेग आणि दिशा लक्षात घेऊन मी अभ्यास केला आणि हा नवा प्रकार विकसित केला आहे. यामुळे तरी निष्पाप व्यक्तींचे बुडून होणारे मृत्यू टळतील असा मला विश्वास आहे'. 

Web Title: Teacher innovate new underwater Yoga technic in Chakan near Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.