पुणे : बनावट कागदपत्रांद्वारे दोघांनी ४९६ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चुकविल्याचे उघडकीस आले आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) पुणे विभागाने या प्रकरणी कारवाई केली आहे. याबाबत कोरेगाव पार्क पोलिसांकडून राजस्थानमधील दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जीएसटी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघे जण राजस्थानातील आहेत. आरोपीने बनावट कागदपत्रांचा वापर करून चार कंपन्यांची स्थापना केली.बनावट व्यवहार, कागदपत्रांद्वारे दोघांनी ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’चा लाभ घेतला. बनावट व्यवहारांद्वारे दोघांनी ४९६ कोटी २७ लाख रुपयांचा कर चुकवेगिरी करून फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. बनावट कंपन्या, व्यवहार दाखवून आरोपींनी त्याचा लाभ काही व्यावसायिकांना मिळवून दिल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला तपास करत आहेत.