माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत तावरे पिता–पुत्रांची ‘किंगमेकर’ भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:22 IST2025-12-26T11:21:37+5:302025-12-26T11:22:00+5:30
या अपक्ष उमेदवारांना राष्ट्रवादीतीलच काही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे मदत केल्याची चर्चा माळेगावमध्ये रंगली आहे.

माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत तावरे पिता–पुत्रांची ‘किंगमेकर’ भूमिका
माळेगाव : माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व जनमत विकास आघाडीला नगराध्यक्षपदासह १३ जागांवर यश मिळाले. मात्र या निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवारांनी अनपेक्षित बाजी मारत राजकीय समीकरणे बदलली. या अपक्ष उमेदवारांना राष्ट्रवादीतीलच काही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे मदत केल्याची चर्चा माळेगावमध्ये रंगली आहे.
अशा परिस्थितीत प्रभाग क्रमांक १०, १४, १५ आणि १७ या चार प्रभागांमध्ये घड्याळ चिन्हावरील उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यात जयदीप दिलीप तावरे व माळेगावचे माजी सरपंच दिलीप तावरे यांनी सिंहाचा वाटा उचलल्याची चर्चा आहे. स्वपक्षातील तीव्र विरोध आणि अंतर्गत गटबाजी डावलून तावरे पिता–पुत्रांनी या चारही प्रभागांत विजय मिळवून दिला.
घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या उमेदवारांपैकी तीन उमेदवार तसेच राष्ट्रवादी–भाजप पुरस्कृत प्रभाग क्रमांक १४ मधील उमेदवार प्रमोद तावरे यांच्या विजयातही तावरे पिता–पुत्रांचा मोठा हातभार असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीदरम्यान माळेगावमध्ये ‘घड्याळ हरत आहे’ असे वातावरण तयार झाले होते. मात्र जयदीप तावरे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून ‘घड्याळ लढते आणि जिंकते’ हे सिद्ध करून दाखवले.
एका बाजूला राष्ट्रवादीतीलच अनेक मातब्बर पदाधिकारी त्यांच्याविरोधात उभे होते. ज्यांनी यापूर्वी व सध्या पक्षातील महत्त्वाची पदे भूषवली आहेत, त्यांनी जयदीप तावरे यांना उमेदवारी मिळू नये तसेच निवडणुकीत पराभूत करण्यासाठी मोठी ताकद लावली होती. तरीही मतदारांच्या साथीने जयदीप तावरे यांनी या सर्वांना चारीमुंड्या चित करत चारही प्रभागांत विजय मिळवून दिला. यामुळे माळेगावच्या राजकारणात त्यांचे महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले आहे.
मला उमेदवारी देऊन अजित पवार यांनी जो विश्वास दाखविला, तो मी सार्थ ठरविला आहे. माझ्यासह इतर प्रभागांतील उमेदवारांना एकत्र करून निवडून आणण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी मला दिले होते. त्या निर्देशांचे तंतोतंत पालन करून माझ्यासह चार नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळाल्याचा मला मनस्वी आनंद आहे. - जयदीप तावरे