टँकर बनलाय ‘लुटेरा’..!
By Admin | Updated: July 17, 2014 03:13 IST2014-07-17T03:13:47+5:302014-07-17T03:13:47+5:30
शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून, टँकरचालकांना सुगीचे दिवस आहेत.

टँकर बनलाय ‘लुटेरा’..!
पुणे : शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून, टँकरचालकांना सुगीचे दिवस आहेत. महापालिकेकडून अवघ्या तीनशे रुपयांनी घेतलेले पाण्याचे टँकर सोसायट्यांना १ ते २ हजार रुपयांना विकले जात आहेत. टँकरच्या काळ्या बाजारावर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नसल्याने नागरिकांची लूट सुरू आहे.
पुण्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने सुरुवात केली. मात्र, अद्यापही जोरदार व पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे खडकवासला धरण क्षेत्रातील पाण्याने तळ गाठला आहे. महापालिकेने टंचाईच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून एकदिवस आड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्यापही सर्व भागांत वेळापत्रकानुसार पुरेसा पाणीपुरवठा नाही. त्यामुळे अपुरा पाणीपुरवठा होणाऱ्या सोसायटींना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या महापालिकेकडून १० हजार लिटरच्या टँकरसाठी ३०० रुपयांचा पास दिला जातो. प्रत्यक्षात पासचा टँकरही हजारो रुपयांना विकला जात आहे.
सध्या १५० खासगी टँकरचालक पालिकेकडून टँकर भरणा करून घेतात. त्यातून पालिकेला महिन्याला २२ लाख मिळतात. परंतु, टँकर चालक टंचाईचा फायदा घेऊन जादा रक्कम उकळत आहे. नडलेले नागरिक पैसे देऊन मोकळे होत आहेत. परंतु, पालिकेचे टँकर चालकांवर नियंत्रण नाही. वडगावशेरी, खराडी, चंदननगर, टिंगरेनगर, धानोरी, हडपसर, काळेपडळ, कोंढवा, सिंहगड रस्त्यावर पुरेसा पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी लूट सुरू आहे. (प्रतिनिधी)