Talathi Bharti: तलाठ्यांची साडेचार हजार पदभरती लवकरच; 'या' महिन्यात होणार परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 21:38 IST2023-06-12T21:34:19+5:302023-06-12T21:38:48+5:30
राज्यातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे...

Talathi Bharti: तलाठ्यांची साडेचार हजार पदभरती लवकरच; 'या' महिन्यात होणार परीक्षा
पुणे : राज्यातील तलाठी गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या भरतीसाठी सरकारने शिथिलता आणल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी लिंक खुली करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील पुण्यासह नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागातील सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांच्या चार हजार ६४४ पदभरतीसाठी लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून परीक्षेसाठीची येत्या काही दिवसांत लिंक खुली करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या अधिक आहे. त्यानुसार, तलाठ्यांमधील नोकरभरतीत आदिवासी समाजाच्या नागरिकांना संधी मिळावी यासाठी ‘पेसा’ नियमानुसार जागा आरक्षित करण्यात येणार आहेत. या परीक्षा घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने टीसीएस कंपनीची निवड केली आहे. ही परीक्षा घेण्यासाठी कंपनीकडून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत. यासंदर्भात सरकारला कळविण्यात आले आहे.
तलाठी पदाच्या परीक्षेचे प्रारूप तयार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढणे शक्य नाही. त्यामुळे येत्या १५ जूनपासून परीक्षेच्या अर्जाच्या नोंदणीसाठी लिंक खुली करण्यात येणार आहे. त्यानंतर २१ दिवसांची मुदत परीक्षा अर्ज भरण्यासाठी देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी राज्यातून एका जिल्ह्यातून एकाच उमेदवाराला अर्ज भरता येणार आहे. आदिवासी क्षेत्रात लोकसंख्येनुसार पदे निश्चित केली जातील. त्यानुसार त्या ठिकाणी अर्ज भरता येणार आहेत. राज्यात गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार, धुळे, अमरावती यासारख्या १२ जिल्ह्यांमध्ये आदिवासींचे प्राबल्य आहे. त्या लोकसंख्येच्या आधारावर तलाठ्यांच्या जागा निश्चित केल्या जाणार आहेत.
याबाबत जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायत म्हणाले, ‘या परीक्षेसाठी लिंक खुली करण्याची परवानगी मागितली आहे. येत्या १५ जूनपर्यंत ही लिंक खुली होईल अशी अपेक्षा आहे. सुमारे पाच लाख उमेदवार परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे. एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार, तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल.’