पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसमध्ये कर्तव्यावर असताना चालक, वाहक व इतर सेवकांनी मोबाईलवर फोटो काढणे, व्हिडीओ शूटिंग करणे, रील्स तयार करणे व त्या सोशल मीडियावर प्रसारित करणे यास कडक बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात पीएमपी प्रशासनाने सर्व आगारांना स्पष्ट निर्देश दिले असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी दिले आहेत.
पीएमपीच्या बसेस मार्गावर संचलनात असताना काही चालक-वाहक व सेवक हे महामंडळाचा गणवेश व ओळखपत्र (आयकार्ड) परिधान करून मोबाईलद्वारे फोटो, व्हिडिओ व रिल्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, काही सेवक कर्तव्यावर असताना कोणतीही अधिकृत परवानगी नसताना ‘रील स्टार’, युट्यूबर किंवा तत्सम व्यक्तींना गणवेश, ई-मशीन व बसेसचा वापर करून चित्रीकरणासाठी सहकार्य करत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. ही बाब पीएमपीच्या अंतर्गत नियम व धोरणांच्या विरोधात असून, यामुळे महामंडळाच्या व्यावसायिक हितासह सार्वजनिक बस सेवेवरील नागरिकांचा विश्वास डळमळीत होत आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, चालक-वाहक कर्तव्यावर असताना गणवेश व आयकार्डसह बसमध्ये कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडिओ शूटिंग किंवा रिल्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करता येणार नाहीत. तसेच, महामंडळाची लेखी व पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही रील स्टार, युट्यूबर किंवा तत्सम व्यक्तींना पीएमपीच्या बसेस, आगार, कार्यालयीन परिसर, गणवेश, ई-मशीन वा आयकार्डचा वापर करून चित्रीकरण करण्यास परवानगी देऊ नये.
पीएमपी ही सार्वजनिक सेवा असून, प्रवाशांचा विश्वास आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. कर्तव्यावर असताना मोबाईलवर रिल्स किंवा चित्रीकरण करणे हे नियमबाह्य आहे. अशा प्रकाराला कुठलीही माफी दिली जाणार नाही. परवानगीशिवाय चित्रीकरण करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. -पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पीएमपी
Web Summary : Pune's PMP bans employees from taking photos or creating reels on duty. Violators will face immediate legal action to maintain public trust and service integrity. Unauthorized filming is also prohibited.
Web Summary : पुणे पीएमपी ने कर्मचारियों के ड्यूटी पर फोटो या रील्स बनाने पर प्रतिबंध लगाया। सार्वजनिक विश्वास और सेवा अखंडता बनाए रखने के लिए उल्लंघनकर्ताओं के खिलाफ तत्काल कानूनी कार्रवाई की जाएगी। अनाधिकृत फिल्मांकन भी निषिद्ध है।