कात्रज-कोंढवा रस्त्यावरील स्मशानभूमी चौकात कायमस्वरूपी उपाययोजना करा; खासदार सुळे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 20:50 IST2023-08-10T20:46:25+5:302023-08-10T20:50:02+5:30
आज झालेल्या अपघातात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे त्याची धडक बसून आठ वाहनांचे नुकसान झाले...

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील स्मशानभूमी चौकात कायमस्वरूपी उपाययोजना करा; खासदार सुळे यांची मागणी
पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्यावर खडीमशिन पोलिस चौकीपासून जवळच झालेल्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. सातत्याने या ठिकाणी अपघात आणि वाहतूक कोंडी होत असल्याने येथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे.
कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे त्याची धडक बसून आठ वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये स्कूल बसचाही समावेश आहे. शिवाय एका व्यक्तीला प्राण गमावावे लागले. या अपघातामुळे जवळपास दोन-तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. अपघात जेथे झाला ती जागा उताराची अरुंद असून अपघातप्रवण आहे. येथे सातत्याने दुर्दैवी घटना घडतात. यापूर्वीही अनेक नागरिकांना या ठिकाणी झालेल्या छोट्या-मोठ्या अपघातांत गंभीर स्वरूपाच्या दुखापतींना सामोरेदेखील जावे लागले आहे. हे रोखण्यासाठी येथे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत पालकमंत्री पुणे आणि राज्य सरकारने सकारात्मक विचार करावा, असे खासदार सुळे यांनी सांगितले.