पुणे: जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात पाण्यावरून वाद सुरू असून पालिका प्रशासनाने पाण्याचा वापर कमी केला नाही तर उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी सोडण्यास अडचण निर्माण होऊ शकते,असे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे. मात्र, शेतक-यांना त्यांच्या वाट्याचे पाणी मिळाले नाही तर जलसंपदा विभागाला शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.त्यामुळे पुण्याच्या पाणी प्रश्नात आता ‘स्वाभिमानी’ने उडी घतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुण्याचे पाणी चांगलेच पेटले आहे. बुधवारी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी पालिकेला पाणी पुरवठा करणारे दोन पंप बंद अचानक बंद केले.त्यामुळे यात आणखीच भर पडली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याला पाणी कमी पडू देणार नाही,सांगूनही जलसंपदा विभागाचे अधिकारी ऐकत नाहीत.त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी सिंचन भवन येथे जाणार असल्याची भूमिका पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यानी घेतली.त्यात शेतक-यांसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात अडचणी येतील,अशी चर्चा सुरू असल्याने शेतक-यांमध्ये रोष निर्माण होत आहे,असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता योगेश पांडे यांनी कळविले आहे. पांडे म्हणाले, पाण्याच्या काटेकोर नियोजनात पुणे महापालिका व संबंधित विभाग अपयशी ठरत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना व ग्रामीण भागातील शेतक-यांनाही पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. तसेच सध्या शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पुण्याचे पाणी नेमके कुठे मुरते ? तसेच शहराच्या भोवती हजारो टँकर इमारतींसाठी पाणी पुरवठा करताना दिसत आहेत.त्यामुळे शेतक-यांच्या वाट्याचे पाणी टँकर माफियांकडून पळवले जात आहे का? तसे असेल तर प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून झोपले आहे का? असा सवाल उपस्थित होतो.
पुण्याच्या पाणी प्रश्नात स्वाभिमानीची उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 15:41 IST