Pune Metro: पुण्यातील एक फलक ज्यावर स्वारगेटऐवजी स्वर्गात असे लिहिले गेले आहे. या फलकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फलक पुणे मेट्रोचा असल्याचा दावा केला गेला. त्यामुळे सोशल मीडियावर पुणे मेट्रो प्रशासनाची खिल्ली उडवली गेली. पुणे मेट्रोने आता स्वर्गात जाता येईल अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्या. या सगळ्यांवर आता पुणे मेट्रो प्रशासनाने खुलासा केला आहे.
सोशल मीडियावर नेटकरी कधी कोणाला लक्ष्य करतील सांगता येत नाही. बऱ्याचदा तर चूक कुणाची आणि बोलणी दुसऱ्यालाच असंही होतं. असाच काहीसा प्रकार घडला आहे. एका फलकामुळे!
पुण्यातील एका फलकाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. हा फलक पुणे मेट्रोचा असल्याचा दावा नेटकऱ्याने केला. त्यानंतर सगळ्यांनीच पुणे मेट्रोची खिल्ली उडवणं सुरू केलं.
पुणे मेट्रोने आता स्वर्गातही जाता येईल, अशा प्रतिक्रिया या फलकावर आल्या. अखेर पुणे मेट्रो प्रशासनाच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी खुलासा केला.
'कृपया लक्ष द्या : समाजमाध्यमांवर तसेच व्हॉट्सअपवर प्रसारित होणारा या फलकाचा फोटो पुणे मेट्रोशी संबंधित नाही', असे सांगत पुणे मेट्रो प्रशासनाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या चर्चांना ब्रेक लावला.
दरम्यान, हा बोर्ड पुणे मेट्रोचा नसून पीएमपीएल म्हणजे शहर बस परिहनचा असल्याचे म्हटले जात आहे.