Sushma Swaraj Death : नवनिर्वाचित खासदारांना द्यायच्या 'हा' कानमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 14:57 IST2019-08-07T14:56:02+5:302019-08-07T14:57:50+5:30
कोणत्याही पदावर कष्ट आणि जिद्दीशिवाय पोचता येत नाही. त्यामुळे साध्या कार्यकर्त्या ते देशाच्या परराष्ट्र मंत्री होण्यापर्यंतचा सुषमा स्वराज यांचाही प्रवास तितका सोपा नव्हता.

Sushma Swaraj Death : नवनिर्वाचित खासदारांना द्यायच्या 'हा' कानमंत्र
पुणे : कोणत्याही पदावर कष्ट आणि जिद्दीशिवाय पोचता येत नाही. त्यामुळे साध्या कार्यकर्त्या ते देशाच्या परराष्ट्र मंत्री होण्यापर्यंतचा सुषमा स्वराज यांचाही प्रवास तितका सोपा नव्हता. अतिशय कणखर नेत्या म्ह्णून काम करत असताना लोकसभेत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या नेत्यांनाही त्या खास शैलीत मार्गदर्शन करत असत. पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांनी त्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (67) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. काल रात्री 9 च्या सुमारास त्यांना एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्याविषयी बोलताना शिरोळे लोकमतला म्हणाले की, 'सुषमाजी या अतिशय स्पष्टवक्त्या, अभ्यासू आणि मूल्यांवर निष्ठा ठेवणाऱ्या नेत्या होत्या. मी २०१४साली पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेल्यावर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले होते. लोकसभा अधिवेशन काळात जास्तीतजास्त वेळ सभागृहात बसून विविध विषयांवरील चर्चा ऐकण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. स्वतःचे भाषण झाल्यावर निघून न जाता बाकीच्यांचे म्हणणे ऐकण्याचा त्यांचा सल्ला कामकाज समजून घेताना मला प्रचंड उपयोगी पडला.
दुसरी आठवण म्हणजे त्या माणसांची ओळख वैशिष्ट्यांसह लक्षात ठेवत असत. आमच्यावेळी ज्येष्ठ खासदारांचे गट करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असू. सुदैवाने मला सुषमाजींच्या गटात काम करण्याचे भाग्य लाभले. त्यावेळी माझी ओळख करून देताना त्यांनी 'ये अनिल शिरोले जीं हैं, पुने से है और हमारे मुंडे साहब के मित्र हैं'. माझ्यासाठी ही ओळख कायम लक्षात राहणारी आहे. कामाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्या भारतात असोत किंवा परदेशात परंतु त्यांचे मंत्रालय शब्दशः २४ बाय ७ सुरु असायचे. कितीतरी वेळा परदेशात अडकलेल्या किंवा अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी फोन करता क्षणीच त्यांनी मदतीला सुरुवात केल्याचे अनुभव आले होते. पक्षाची बैठक असो किंवा संसदेतील भाषणे त्या पूर्ण तयारी करूनच बोलायच्या. त्यामुळे त्यांचा मुद्दा कायमच स्पष्टपणे आणि सोप्या भाषेत कोणतीही गुंतागुंत न करता त्या मांडायच्या. आज मोदी सरकारचा दुसरा टप्पा सुरु असताना त्यांची राहून राहून आठवण येत राहील. त्यांच्यासारख्या अनुभवी आणि कुशल व्यक्तीची देशाला गरज होती.