खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्याच्या जागेचा वापर ठरविण्यासाठी सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:41 IST2025-12-10T10:40:30+5:302025-12-10T10:41:25+5:30
- जलसंपदा विभागाकडून सल्लागार कंपनीची नेमणूक

खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्याच्या जागेचा वापर ठरविण्यासाठी सर्वेक्षण
पुणे : पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी जलसंपदा विभागाने खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान बोगद्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे सध्याचा कालवा बंद होणार असून त्याची सुमारे ३० किलोमीटर लांबी आणि सुमारे पाचशे मीटर ते एक किलोमीटर रुंदीच्या जागेचे सर्वेक्षण करून त्याचा वापर कसा करता येईल, यासाठी जलसंपदा विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे. या जागेचे काय करायचे, त्यातून विभागाला उत्पन्न कसे मिळेल आणि प्रकल्पासाठीचा खर्च कशा पद्धतीने उभा करता येईल, याबाबत अहवाल सादर करण्यासाठी एका सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.
खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान सध्या बोगद्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुमारे दीड हजार कोटींची ही योजना आहे. या योजनेमुळे सुमारे अडीच टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. दरम्यान प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तो पूर्ण होण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कालव्याची सुमारे ५०० मीटर ते एक किलोमीटर या रुंदीची जागा उपलब्ध होणार आहे. त्यातील काही भाग महापालिका व पीएमआरडीए हद्दीत येते. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जागा हस्तांतरित करता येईल का, त्या माध्यमातून काही निधी उभारता येईल का, याची चाचपणी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.
त्यानुसार महापालिकेने कालवा बंद केल्यानंतर नेमकी किती जागा उपलब्ध होऊ शकते. त्याच जागेचा काय वापर करता येईल, याचे सर्वेक्षण एका सल्लागार कंपनीची नियुक्ती करून केले होते. संबंधित सल्लागार कंपनीने खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान सुमारे ३० किलोमीटर लांबीच्या कालव्याचे सर्वेक्षण करून प्रारूप अहवाल महापालिकेकडे सादर केला आहे. आता जलसंपदा विभागाने स्वतंत्रपणे या जागेचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यासाठी निविदा काढून सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. संबंधित सल्लागार कंपनीकडून लवकरच प्राप्त होईल, त्यानंतर त्या जागेबाबतचा निर्णय राज्य सरकारची मान्यता घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. कालवा बंद केल्यानंतर सुमारे ६५ लाख १९ हजार ४८५.४५ चौरस मीटर जागा उपलब्ध होऊ शकते. त्यापैकी ७ लाख ७७ हजार ३२९.९१ चौरस मीटर जागेवर अतिक्रमण झाले असल्याचे दिसून आले.