वाळू माफियांवर सर्जिकल स्ट्राइक..! १३ बोटी नष्ट, २ कोटी ६० लाखांचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 10:39 IST2025-02-14T10:39:13+5:302025-02-14T10:39:58+5:30
या कारवाईमुळे वाळू माफियांना तब्बल २ कोटी ६० लाखांचा फटका बसला आहे.

वाळू माफियांवर सर्जिकल स्ट्राइक..! १३ बोटी नष्ट, २ कोटी ६० लाखांचा फटका
इंदापूर -पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांवर जोरदार कारवाई करत प्रशासनाने उजनी पाणलोट क्षेत्रात मोठी धडक दिली. इंदापूर तालुका ते बिटरगाव वांगी या परिसरात वाळू उपसा करणाऱ्या १३ बोटी पकडून बुडवण्यात आल्या, तर ३ सक्शन बोटी जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे वाळू माफियांना तब्बल २ कोटी ६० लाखांचा फटका बसला आहे.
संयुक्त मोहिमेचा दणका
सोलापूर जिल्ह्याचे महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली.
ड्रोनच्या मदतीने ‘ऑपरेशन क्लीन अप’
माळवाडी जॅकवेल ते करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगीपर्यंत पाठलाग करत या पथकाने वाळू माफियांच्या बोटी पकडल्या आणि बुडवून नष्ट केल्या. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील ड्रोन सर्वेअर संकेत बाबर यांच्या मदतीने ही कारवाई अधिक प्रभावीपणे पार पाडली गेली.
वाळू माफियांना इशारा..!
इंदापूरचे माजी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या सहभागामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या धडक कारवाईचा अनुभव आणि प्रभाव ओळखून माफियांना प्रशासनाचा कडक इशारा मिळाला आहे.
वाळू माफियांवरची ही कारवाई फक्त सुरुवात आहे का?
वाळू माफियांवर झालेल्या या महासर्जिकल स्ट्राइकनंतर पुढील कारवाई काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाच्या या धडक पावलांमुळे वाळू माफियांचा पुढील डावपेच काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.