PMC Election: 'टीम देवेंद्र'मध्ये सुरेंद्र पठारे यांची एन्ट्री; पूर्व पुण्यावर भाजपची पकड आणखी घट्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:43 IST2025-12-20T13:41:47+5:302025-12-20T13:43:55+5:30
संघटनात्मक ताकद, नियोजनबद्ध कामकाज आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे सुरेंद्र पठारे यांची भूमिका आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकते

PMC Election: 'टीम देवेंद्र'मध्ये सुरेंद्र पठारे यांची एन्ट्री; पूर्व पुण्यावर भाजपची पकड आणखी घट्ट
पुणे : पुणे शहराच्या पूर्व भागातील अभ्यासू, प्रभावी आणि संघटन कौशल्यासाठी ओळख असलेले नेते सुरेंद्र पठारे यांनी अखेर भारतीय जनता पक्षमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पूर्व पुण्यात भाजपची राजकीय पकड अधिक भक्कम होणार असल्याचे बोलले जात आहे. संघटनात्मक ताकद, नियोजनबद्ध कामकाज आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे सुरेंद्र पठारे यांची भूमिका आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकते, असा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
सुरेंद्र पठारे यांच्या प्रवेशामुळे पुण्यातील ‘टीम देवेंद्र’ अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टी, विकास आणि आधुनिक शहरी नियोजनासाठी ओळखले जाणारे नेते आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यांनी पुणे शहरात सुमारे ३००० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. याच वेळी पुणे हे केवळ सांस्कृतिक वारसा जपणारे शहर नसून, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या जोरावर जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची क्षमता असलेले शहर असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘भविष्यातील पुणे’ या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार देण्यासाठी अभ्यासू, व्हिजन असलेले आणि जमिनीवर काम करणारे नेतृत्व आवश्यक आहे. त्या दृष्टीने सुरेंद्र पठारे यांचा भाजपमध्ये समावेश ही पक्षासाठी महत्त्वाची भर मानली जात आहे.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांच्या विजयामागे सुरेंद्र पठारे यांचे मोलाचे योगदान होते. प्रचाराची संपूर्ण जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली होती. नियोजनबद्ध प्रचार, कार्यकर्त्यांचे प्रभावी नेटवर्क आणि मतदारांशी थेट संवाद साधण्याची त्यांची पद्धत यामुळे त्यांची संघटनात्मक क्षमता प्रकर्षाने समोर आली होती. याच निवडणुकीनंतर भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष त्यांच्या कार्यशैलीकडे वेधले गेले आणि तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अखेर आज त्या चर्चांना प्रत्यक्षात उतरलेला निर्णय मिळाला आहे.
राजकारणासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही सुरेंद्र पठारे यांची भक्कम ओळख आहे. पुण्यातील सीईओपी महाविद्यालयातून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून, ते गोल्ड मेडलिस्ट राहिले आहेत. लोहगाव, वाघोली, खराडी, चंदननगर या झपाट्याने विकसित होत असलेल्या भागांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. अर्बन डेव्हलपमेंट, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांसारख्या विषयांवर त्यांनी यापूर्वी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना आणि चर्चासत्रांना पूर्व पुण्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
एकूणच, सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशामुळे केवळ पक्षाची संघटनात्मक ताकद वाढली नसून, पुण्याच्या विकासात्मक राजकारणातही नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.