सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 02:24 PM2024-06-13T14:24:16+5:302024-06-13T14:26:31+5:30

शहर आणि तालुक्यात सर्व संस्थांवर वर्चस्व असताना सुनेत्रा पवार यांचा झालेला पराभव संस्थेचे प्रमुख, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या जिव्हारी लागला होता....

Sunetra Pawar's candidature for Rajya Sabha, discussion about her appointment in the Union Cabinet | सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची चर्चा

सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची चर्चा

बारामती (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी (दि. १३) मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी उपस्थित होते.

शहर आणि तालुक्यात सर्व संस्थांवर वर्चस्व असताना सुनेत्रा पवार यांचा झालेला पराभव संस्थेचे प्रमुख, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या जिव्हारी लागला होता. सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर अजित पवार गटात कमालीची शांतता होती. मात्र, आज त्यांचा राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यसभा खासदारकीनंतर पवार यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची चर्चा आहे. त्यामळे बारामतीत अजित पवार गटाला आणखी बळ मिळणार आहे.

दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आतापासूनच विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पवार यांनी बारामती शहरात विविध मेळावे, तर लोकसभा मतदारसंघात दुष्काळी दाैऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसर पुन्हा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. ज्येष्ठ नेते पवार यांना देखील कार्यकर्ते यांनी त्यांच्याच विधानसभा उमेदवारीसाठी साकडे घातले आहे. त्यामुळे विधानसभेत काका पुतण्याची लढत होण्याचे संकेत आहेत. सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर राज्यसभेवर त्यांना खासदारकी देण्याची पावले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाकली आहेत.

आता केंद्रीय मंत्रीपद देण्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे बारामतीच्या राजकारणात पवार विरुध्द पवार 'कांटे की टक्कर' होईल. आगामी राजकीय घडामोडी नेमके कोणते वळण घेणार, याबाबत राजकीय ‘सस्पेन्स’वाढला आहे. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यास बारामतीला एकाच कुटुंबातील तीन खासदार मिळणार आहेत.

Web Title: Sunetra Pawar's candidature for Rajya Sabha, discussion about her appointment in the Union Cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.