केंद्र सरकारच्या महिला सशक्तीकरण समितीत सुनेत्रा पवार यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:32 IST2025-04-30T15:31:49+5:302025-04-30T15:32:05+5:30
सुनेत्रा पवार या मागील वीस वर्षांपासून महिला सबलीकरण व महिलांच्या आर्थिक विकासासाठी कार्यरत आहेत

केंद्र सरकारच्या महिला सशक्तीकरण समितीत सुनेत्रा पवार यांचा समावेश
बारामती : केंद्र सरकारच्यामहिला सशक्तीकरण विषयक संसदीय समितीमध्ये राज्यसभा खासदार सुनेत्रा अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला सशक्तीकरण हि एक महत्त्वाची संसदीय समिती आहे, जी महिलांच्या हक्क, कल्याण आणि सशक्तीकरणाशी संबंधित मुद्द्यांवर काम करते. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ डी. पुरंदेश्वरी असून या समितीत एकूण तीस सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये वीस सदस्य लोकसभेतून, लोकसभा अध्यक्षांद्वारे नामनिर्देशित केलेले असून दहा सदस्य राज्यसभेतून, राज्यसभा सभापतींकडून नामनिर्देशित करण्यात आलेले आहेत. या मध्ये बारामतीच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचा समावेश करण्यात आला आहे.
सुनेत्रा पवार या मागील वीस वर्षांपासून महिला सबलीकरण व महिलांच्या आर्थिक विकासासाठी कार्यरत आहेत. बारामती हाय-टेक्सटाईल पार्कच्या सुनेत्रा पवार या अध्यक्षा असून येथील कंपन्यांमध्ये किमान तीन हजार महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिलांच्या आरोग्यासाठी देखील सुनेत्रा पवार कार्यरत असून सातत्याने विविध आरोग्य शिबिरे आणि महिलांसाठी मोफत उपचार त्यांच्या मार्फत राबविले जातात. एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया हि संस्था देखील मागील पंधरा वर्षांपासून सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग संवर्धन आणि जाणीव जागृती करण्याचे काम करीत आहे. सामाजिक आणि महिला सबलीकरणासाठी आज अखेर केलेले कार्य लक्षात घेऊन राज्यसभा सभापती यांनी महिला सबलीकरणाच्या समितीमध्ये सुनेत्रा पवार यांची नियुक्ती केली आहे.
महिला सशक्तीकरण समितीची प्रमुख कार्ये
- केंद्र सरकारने महिलांच्या समानता, प्रतिष्ठा आणि सन्मानासाठी घेतलेल्या उपाययोजनांचे परीक्षण करणे.
- राष्ट्रीय महिला आयोग (National Commission for Women) प्रस्तुत केलेल्या अहवालांचे परीक्षण करणे.
- महिलांच्या स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या उपाययोजनांवर अहवाल सादर करणे.
- महिला आरोग्य धोरण आणि त्यावरील शिफारसी करणे
- योग आणि क्रीडा सुविधांमध्ये महिलांचा सहभाग वाढविणे.