Sunday chat: The moonlight in darkness | रविवारच्या गप्पा : काळोखातील चांदणे
रविवारच्या गप्पा : काळोखातील चांदणे

वेगळ्या वाटेचे हे वळण त्यांच्या आयुष्यात आले तरी कसे? राजू इनामदार यांनी त्यांच्याबरोबर साधलेला संवाद... 

....................

थोडा वेळ दिवे गेले तरी आपल्याला राहवत नाही, आणि अंध व्यक्ती आयुष्यभर अंधार घेऊन कशी जगत असेल? हा एक प्रश्न पडला आणि स्वागत थोरात नावाच्या एका तरूण चित्रकाराचे, रंगकर्मीचे आयुष्यच बदलून गेले. त्यांच्या जीवनात प्रकाश करण्यासाठी, त्यांच्या आयुष्याच्या काळोखात चांदणं निर्माण करण्यासाठी जगायचे असे त्याने मनाशी ठरवून टाकले व त्यातूनच मग आकाराला आले एक वेगळेच विश्व! 
स्वागत हे घडवतात कसं? 
स्वागत सांगू लागतात. ‘‘बालचित्रवाणीसाठी अंधावर माहितीपट तयार करताना मी अगदी आतून हलून गेलो होतो. हे कसे जगत असतील ते अनुभवण्यासाठी म्हणून मी स्वत: तब्बल दोन महिने डोळ्यांना काळी पट्टी बांधून काढले. अजूनही मी ही सवय कायम ठेवली आहे. यातून अंधाना काय वाटत असेल हे मला बरोबर समजते.’’


इथपर्यंत ठीक आहे, पण नाटक? ते कसे बसवता? त्यांना हालचाली, आवाजाचे चढउतार समजून सांगणे किती अवघड होत असेल! ‘अवघड तर आहेच, पण आपण एक गोष्ट नेहमीच विसरतो’. स्वागत शांतपणे सांगू लागतात. ‘‘अंधांना फक्त डोळे नाहीत, बाकी सगळ्या भावना आहेत. राग, आनंद हा त्यांच्याही चेहºयावर दिसतो. आवाजाचे चढउतार त्यांनाही कळतात. दिसत नाही ही मोठीच समस्या, मात्र त्यामुळेच त्यांची बाकीची ज्ञानेद्रिये अत्यंत सक्षम झालेली असतात. कान, नाक, स्पर्श यांना प्रभावी संवेदना प्राप्त झालेल्या असतात. त्याचा उपयोग नाटक बसवताना होतो.’’
म्हणजे नक्की करता काय? प्रश्न सवयीचा असल्यामुळे की काय स्वागत सहज म्हणाले, ‘‘एखाद्या संवादावर काय हालचाल करायची हे अंध कलाकाराला त्याच्या शेजारी उभे राहून करून दाखवावे लागते, म्हणजे कुठे आहे असे हाताने दाखवायचे झाल्यास हात उंच करायचा, पंजाची बोटे थोडी आतील बाजूला वळवून हात दोनतीन वेळा हलवायचा हे त्याला करून दाखवायचे, ते तो हाताने चाचपून पहातो, बरोबर असेल तर तसे सांगायचे. त्यांची स्मरणशक्तीही चांगली असते. त्यामुळे एकदा एखादी हालचाल बसवून घेतली की त्या संवादाला ते बरोबर तसेच करतात.’’ 
या वेगाने प्रत्यक्ष नाटक बसवायला किती वेळ लागत असेल? ‘चौपट वेळ लागतो.’ स्वागत यांनी सांगितले. ‘‘एरवीच्या नाटकांचे दिग्दर्शन आणि हे यात फरक आहे. वेळ तर भरपूर लागतोच, मात्र त्याचा अंतीम परिणाम लक्षात घेता हे कष्ट काहीच वाटत नाही. अंध कलावंत कुठेही न चुकता, न अडखळता व्यावसायिक सफाईने पुर्ण लांबीचे नाटक सादर करतात ही गोष्टच किती वेगळी आहे. रंगमंचावरचा त्यांच्या कलेचा आविष्कार डोळसांचे डोळे दिपतील असाच असतो. त्यामुळे त्यांच्याकडून नाटक बसवताना हा अंतीम परिणाम लक्षात ठेवला की कसलाच त्रास होत नाही.’’
नाटकात डोळे महत्वाचे! तेच नसलेल्या नाट्यप्रयोगात काहीतरी हरवल्याची भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण होत असेल तर? ‘तसे होत नाही’. ठाम स्वरात स्वागत उत्तरले. ‘‘काही कलावंतांचे काम इतके सुरेख होते की त्यांना दृष्टी नाही असे जाणवतही नाही. त्यांच्या हालचाली थोड्या संथ असतात इतकेच. नाटकात काम केल्यानंतर त्यांच्यात बदलही होतो.आपल्यात काही कमी आहे ही भावनाच त्यांच्या मनात रहात नाही. आत्मविश्वास वाढतो. दिग्दर्शक म्हणून मला याचे समाधान वाटते.’’
‘अपूर्व मेघदूत’, ‘तीन पैशांचा तमाशा’ अशी वेगळी नाटके स्वागत यांनी अंध कलावंतांना घेऊन बसवली. ‘स्पर्शज्ञान’ हे ब्रेल लिपीतील अंधांसाठीचे पहिले पाक्षिक ते चालवतात. ‘रिलायन्स दृष्टी’ या प्रकाशनाचेही ते संपादक आहे. ग्रामीण भागातील अंधासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारी एक कार्यशाळा ते घेतात. वेगळे काही करायचे असे ठरवून केले नाही. होत गेले सगळे, अंधांसाठी काही करत असल्यामुळे  माझ्या आयुष्यात प्रकाश निर्माण झाला अशी त्यांची भावना आहे. 


Web Title: Sunday chat: The moonlight in darkness
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.