चासकमान धरणाचा परिसर पीपीपी तत्त्वावर पर्यटन क्षेत्रास योग्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 01:26 PM2019-07-26T13:26:04+5:302019-07-26T13:28:49+5:30

चासकमान धरण परिसरात डोंगरदऱ्या, घनदाट वनराई, उंच-उंच वृक्षांची लागलेली स्पर्धा, लाल मातीने जिवाभावाची नाती असं साधंसोपं वर्णन केलं जात आहे.

Suitable chaskaman dam area for tourism sector on PPP basis | चासकमान धरणाचा परिसर पीपीपी तत्त्वावर पर्यटन क्षेत्रास योग्य

चासकमान धरणाचा परिसर पीपीपी तत्त्वावर पर्यटन क्षेत्रास योग्य

googlenewsNext
ठळक मुद्देविश्रामगृहाचा दर्जा सुधारण्यास मिळेल मदत : नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार

चासकमान : चासकमान धरणाचा परिसर म्हणजे काय?’ असं कुणी विचारलं, की एका झटक्यात सांगितलं जाई ‘जलाशय अन् पांढरेशुभ्र तुषार उडवीत सुंदर धबधबे, लाटा, उंच-उंच गर्द झाडीचे सौंदर्य, भौगोलिक, धार्मिक, कृषी, आनंद आणि निसर्गाने पांघरलेला हिरवा शालू.’ यामुळे चासकमान धरण परिसर पर्यावरणपूरक पीपीपी तत्त्वावर पर्यटनक्षेत्र विकसित करण्यासाठी योग्य आहे.
पुण्यापासून ६० किलोमीटर अंतरावर, राजगुरुनगरपासून १२ किलोमीटर अंतरावर, शिरूर-भीमाशंकर राज्य मार्ग क्रमांक ५४ वर निसर्गरम्य ठिकाणी चासकमान धरणाचा परिसर असल्याने एक-दोन दिवसांची सहल सहज करू शकतात. यामुळे धरण परिसरात पर्यटनक्षेत्र विकसित करण्याबरोबरच जलसंपदा खात्याच्या विश्रामगृहाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.
चासकमान धरण परिसरात डोंगरदऱ्या, घनदाट वनराई, उंच-उंच वृक्षांची लागलेली स्पर्धा, लाल मातीने जिवाभावाची नाती असं साधंसोपं वर्णन केलं जात आहे. इथला निसर्ग तसा प्रतिकूल असला तरी त्यातून मार्ग काढत समाधान मानत परिसरातील नागरिक गुण्यागोविंदाने राहत आले आहेत.
जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या ‘पर्यटनक्षम’ धरणाबरोबरच धरणक्षेत्राच्या जवळ असलेल्या स्वत:च्या मालकीच्या अतिरिक्त जमिनी विश्रामगृहे आणि रिक्त वसाहतीचा विकास खासगी व सरकारी सहभाग (पीपीपी) तत्त्वावर खासगी यंत्रणांकडून करण्याच्या धोरणाला राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे.
यामुळे चासकमान धरणाच्या परिसरात पर्यटनक्षेत्र विकसित करण्यासाठी प्रयत्न केल्यास प्रकल्पग्रस्त स्थानिक नागरिकांना हक्काचा व्यवसाय करून रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवाय, पाटबंधारे विकास महामंडळाला महसूलही मिळेल. 
धरण परिसरात पर्यावरणपूरक मनोरंजन पार्क, पर्यटनस्थळे, विश्रामगृह विकसित करणे, तंबू सोय, जलक्रीडा, नौकानयन, प्रदर्शन केंद्र, हिल स्टेशन आदी सोयीसुविधा धरण परिसरात उभारल्यास पर्यटन व्यवसाय, उद्योगधंदे, संस्कृती यांची नव्याने ओळख होईल.
......
चासकमान धरण परिसरात काय पाहता येईल?
चास गावात काशीबाई पेशवे यांचे जन्मघर, पेशवेकालीन वाडा, काशीबाईंनी भीमा नदीकाठी बांधलेले सोमेश्वर मंदिर, भौगोलिक महत्त्व प्राप्त झालेले रांजणखळे, पुरातन लक्ष्मी-विष्णू मंदिर, कडधे येथील खंडोबा मंदिर, बीबी परिसरातील शंभू महादेव मंदिर, वाडा येथील गडदूबाई मंदिर, भातशेती या सर्व गोष्टी या परिसरातील वैभव आहे.
......
निसर्गाने चासकमान धरण परिसराच्या पदरात सौंदर्याचे दान भरभरून टाकले आहे. निसर्गाचे हे अद्भुत रंग व त्यातील सौंदर्य पाहण्यासाठी पाहिजे ती सौंदर्यदृष्टी. पावसाळा सुरू झाल्यानंतर एरवी भकास वाटणारी उजाड माळराने, डोंगरही पानाफुलांचा, झाडाझुडपांचा हिरवा साज पांघरतात. यामुळे एक वेगळेच सौंदर्य त्यांना प्राप्त होते.

Web Title: Suitable chaskaman dam area for tourism sector on PPP basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.