विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; हुंडाबळीप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 19:20 IST2022-03-05T19:16:59+5:302022-03-05T19:20:56+5:30
सासरच्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल...

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; हुंडाबळीप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल
पिंपरी : माहेरच्यांकडून पैसे घेऊन ये, असे म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. रामनगर, गव्हाणेवस्ती, भोसरी येथे ७ मे २०२१ ते ३ मार्च २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरती सुनील खडसे (वय २१), असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. मयत विवाहितेच्या वडिलांनी याप्रकरणी ४ मार्च २०२२ रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मयत विवाहितेचा पती सुनील त्र्यंबक खडसे (वय ३०), सासरे त्र्यंबक खडसे, सासू आणि चार नणंद तसेच एका नणंदेचा पती यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी आरती ही तिच्या सासरी नांदत असताना आरोपींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. माहेरच्यांकडून पैसे घेऊन ये, असे म्हणून वेळोवेळी पैशांची मागणी करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे तिने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला, असे फिर्यादीत नमूद आहे. मयत विवाहितेच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार हुंडाबळी प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.