देशातील साखर उत्पादन १८ टक्क्यांनी घटले; उत्तर प्रदेशची आघाडी, महाराष्ट्राचा नंबर कितवा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 02:41 IST2025-05-16T02:39:11+5:302025-05-16T02:41:42+5:30
यंदा उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावत ९२ लाख ८० हजार टन उत्पादन घेतले.

देशातील साखर उत्पादन १८ टक्क्यांनी घटले; उत्तर प्रदेशची आघाडी, महाराष्ट्राचा नंबर कितवा?
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : देशातील साखर हंगाम जवळपास संपला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन १८ टक्के अर्थात ५८ लाख टन एवढे घटले आहे. यंदा साखरेच्या एकूण उत्पादनाने २५७.४० लाख टनाची नोंद केली आहे. गेल्यावर्षी हेच उत्पादन ३१५.४० लाख टन इतके झाले होते. सरासरी साखर उताऱ्यातही ०.८० टक्क्यांनी घट होऊन यंदा केवळ ९.३० टक्के साखर उतारा मिळाला आहे, अशी माहिती राष्ट्रीय साखर महासंघाने दिली.
यंदा उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावत ९२ लाख ८० हजार टन उत्पादन घेतले. महाराष्ट्रात ८० लाख ९५ हजार टन उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात गेल्यावर्षी ११० लाख २० हजार टन उत्पादन झाले होते. ऊस आणि साखर उताऱ्यातील घट यामुळे उत्पादन कमी झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे हंगामाअखेर साखरेचे उत्पादन २६१ लाख १० हजार टन होण्याची अपेक्षा आहे.
इथेनॉलऐवजी यंदा साखरेला प्राधान्य?
चालू हंगामात इथेनॉल उत्पादनासाठी ३२ लाख टन प्रत्यक्ष साखर वळविण्यात येईल, असा अंदाज आहे. यापूर्वी इथेनॉलसाठी ३५ लाख टनचे लक्ष्य ठेवले होते. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उत्पादनात सर्वाधिक घट झाली. उत्तर प्रदेशात यंदा ९२ लाख ७५ हजार टन, तर गेल्यावर्षी १०३ लाख ६५ हजार टन उत्पादन झाले होते. तर कर्नाटकात ४० लाख ४० हजार टन व गेल्यावर्षी ५१ लाख ४० हजार टन उत्पादन झाले.