साखरेत ३० लाख टनांची घट, राज्यातील गाळप हंगाम अखेर संपला साखर उतारा पाऊण टक्क्यांनी घसरला
By नितीन चौधरी | Updated: April 18, 2025 15:06 IST2025-04-18T15:04:40+5:302025-04-18T15:06:28+5:30
राज्यात गेल्या वर्षाच्या साखर हंगामात २०७ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता.

साखरेत ३० लाख टनांची घट, राज्यातील गाळप हंगाम अखेर संपला साखर उतारा पाऊण टक्क्यांनी घसरला
पुणे : वळवाच्या पावसाचा अभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे अल्पावधीचा ठरलेला साखर गाळप हंगाम अखेर संपला आहे. यंदा राज्यात ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ते तब्बल ३० लाख टनांनी घटले आहे. तर साखर उताऱ्यातही पाऊण टक्क्याची घट झाली असून, यंदा ९.४८ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला आहे. सर्वाधिक २२ लाख ४६ हजार टन साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे, तर याच विभागात सर्वाधिक ११ टक्के साखर उतारा मिळाला आहे. त्या खालोखाल १९ लाख ९९ हजार टन साखर उत्पादन व ९.६५ टक्के उतारा मिळाला आहे.
राज्यात गेल्या वर्षाच्या साखर हंगामात २०७ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. त्या तुलनेत यंदा सात कारखान्यांची घट होऊन ९९ सहकारी व १०१ खासगी अशा एकूण २०० कारखान्यांनी साखर गाळप हंगाम सुरू केला होता. यंदाचा गाळप हंगाम एक नोव्हेंबर रोजी सुरू होणे अपेक्षित असताना विधानसभा निवडणूक व त्यानंतर आलेली दिवाळी यामुळे हंगामास तुलनेने महिनाभराचा उशीर झाला. तरीदेखील यंदा पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे यंदा राज्यात उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले. तसेच गेल्या वर्षाच्या अतिपावसामुळे ऊस लागवडीवर झाल्याने यंदा गाळपाला आलेला ऊस तुलनेने कमी होता. त्या जोडीला यंदाचे कोरडे हवामान तसेच अवकाळी पावसाचा अभाव यामुळे साखर उतारा कमी होऊन साखर हंगाम लवकर आटोपला. परिणामी १५ एप्रिलपर्यंत २०० कारखान्यांपैकी पुणे जिल्ह्यातील विघ्नहर कारखान्याचा अपवाद वगळता अन्य १९९ कारखान्यांनी गाळप संपविले आहे.
राज्यात यंदा ८५२ लाख ३४ हजार टन उसाच्या गाळपातून ८० लाख ७६ हजार टन साखर उत्पादन झाले आहे, तर सरासरी साखर उतारा ९.४८ टक्के मिळाला आहे. सर्वाधिक २२ लाख ४६ हजार टन साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे, तर याच विभागात सर्वाधिक ११ टक्के साखर उतारा मिळाला आहे. त्या खालोखाल १९ लाख ९९ हजार टन साखर उत्पादन व ९.६५ टक्के उतारा मिळाला आहे. गेल्या वर्षी याचवेळी १ हजार ७३ लाख टन उसाच्या गाळपातून ११० लाख टन साखर उत्पादन व सरासरी १०.२५ टक्के उतारा मिळाला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात ३० लाख टनांची घट झाली आहे.
विभागनिहाय साखर उत्पादन (लाख टन)-- साखर उतारा (टक्के)
कोल्हापूर--२२.४६--११.०८
पुणे १९.९९--९.६५
सोलापूर १०.७५--८.१३
अहिल्यानगर १०.२१--८.९३
संभाजीनगर ६.५२--८.०३
नांदेड ९.५४--९.६७
अमरावती १.०७--८.९७
नागपूर ०.१९--५.१२
एकूण ८०.७६--९.४८