पार्थ पवार जमीन प्रकरणी दुय्यम निबंधक निलंबित; अवघ्या ५०० रुपयांत स्टॅम्पपेपरवर करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:30 IST2025-11-07T12:30:21+5:302025-11-07T12:30:56+5:30
हिंमत असेल तर अजित पवारांवर कारवाई करा: अंजली दमानिया

पार्थ पवार जमीन प्रकरणी दुय्यम निबंधक निलंबित; अवघ्या ५०० रुपयांत स्टॅम्पपेपरवर करार
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या तीनशे कोटींच्या ४० एकर जमीन नोंदणी प्रकरणात सहा कोटी रुपयांचा सेस न घेतल्याबद्दल दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचे राज्य सरकारने निलंबन केले आहे. दरम्यान, या प्रकरणी फक्त अधिकाऱ्यांनाच बकरे बनवू नका. हिंमत असेल तर कारवाई उपमुख्यमंत्री अजित पवारांवर करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
मुंढवा येथील १६.१९ हेक्टर भूखंड खरेदीचा व्यवहार २० मे रोजी झाला. अमेडिया इंटरप्रायझेस एलएलपीचे भागीदार दिग्विजय पाटील यांनी ही खरेदी केली. खरेदीदारांनी लेटर ऑफ इंटेंट आयटी दर्शविले. त्यामुळे या व्यवहाराला मुद्रांक शुल्क लागले नाही. मात्र, दुय्यम निबंधक तारू यांनी एक टक्का स्थानिक संस्था कर आणि एक टक्का मेट्रो कर (सेस) असे सुमारे सहा कोटी रुपयांचे मुद्रांक घेतले नाही. तारू यांच्यावर कारवाई करावी, अशी शिफारस प्रभारी नोंदणी महानिरीक्षक सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे केली होती.
अवघ्या ५०० रुपयांत स्टॅम्पपेपरवर करार
छत्रपती संभाजीनगर : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटी रुपयांची महार वतनाची ४० एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीला केवळ तीनशे कोटी रुपयांत देण्यात आली. हा व्यवहार केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर कसा करण्यात आला, असा सवाल उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला. अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
जागेशी एमआयडीसीचा संबंध नाही: सामंत
रत्नागिरी : पुणे - कोरेगाव परिसरात आयटी पार्क करण्यासाठी मे. अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीला सूट दिल्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळावर आरोप करण्यात येत आहेत. संबंधित जागा आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
मला जो न्याय तोच अजित पवार यांना: एकनाथ खडसे
जळगाव: भोसरी जमीन खरेदी प्रकरणात माझ्या नातेवाइकांनी स्वस्तात जमीन घेतल्याप्रकरणी माझ्यावर आरोप झाल्यानंतर आपण राजीनामा दिला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाने बेकायदेशीर व्यवहार करून जमीन घेतल्याचा आरोप होत असल्याने त्यांनीही नैतिकता दाखवून चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.