विद्यार्थिनींनी विरोध करणे गरजेचे, रोडरोमियोंवर कडक कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:03 IST2018-08-28T23:03:13+5:302018-08-28T23:03:51+5:30
कडक कारवाई करणार : रोडरोमिओ, छेडछाड करणाऱ्या टोळक्यांना इशारा

विद्यार्थिनींनी विरोध करणे गरजेचे, रोडरोमियोंवर कडक कारवाई करणार
कुरकुंभ : शालेय जीवन ही आयुष्यातील ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी आहे. त्यामुळे त्याला टवाळखोरांच्या नादी लागून वाया घालवू नये. आपल्या घरातदेखील आई, बहीण असल्याची जाण राखावी; अन्यथा सध्या रोडरोमिओ व अन्य छेडछाड करणाºया गुन्हेगारांना कायदा त्याच्या माध्यमातून जो धडा शिकवीत आहे; त्याला बळी पडू नका, अशा कडक शब्दांत दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी उपस्थितांचे कान टोचले.
कुरकुंभ (ता. दौंड) येथील फिरंगाई माता विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छेडछाडीविरुद्ध विद्यार्थ्यांना जागृत करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुरकुंभच्या उपसरपंच सुनीता चव्हाण, मुख्याध्यापक नानासाहेब भापकर, माजी सरपंच रशीद मुलाणी, सुनील पवार, ग्रामपंचायत सदस्य विनोद शितोळे, आयूब शेख, विजय गिरमे, उमेश सोनवणे, जाकीर शेख, सायरा शेख, अपर्णा साळुंके, साधना भागवत, भामाबाई दोडके, सनी सोनार, शंकर चव्हाण, शिक्षक, पोलीस कर्मचारी व पालक उपस्थित होते.
सुरक्षिततेचा प्रश्न
सध्या सर्वच शाळा, विद्यालये व अन्य गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असताना ग्रामीण भागात अशा काही घटना घडण्याआधी खबरदारी म्हणून अशा प्रकारचा संवाद होणे गरजेचे असल्याचे मत प्राचार्य भापकर यांनी व्यक्त केले.