अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थीच ‘अनभिज्ञ’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 04:21 AM2018-08-22T04:21:48+5:302018-08-22T04:22:14+5:30

विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे प्रशासनाचा काणाडोळा; सेमिस्टर सुरू पण माहिती मिळेना

Students are 'unaware' about curriculum | अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थीच ‘अनभिज्ञ’

अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थीच ‘अनभिज्ञ’

Next

पुणे : शैक्षणिक वर्षामधले तिसरे सेमिस्टर सुरू होऊनही फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) च्या सिनेमॅटोग्राफी विभागातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची माहिती दिलेली नाही, त्यामुळे सेमिस्टरमध्ये काय शिकविले जाणार आहे, याबाबत विद्यार्थीवर्गच ‘अनभिज्ञ’आहे. एफटीआयआयच्या संचालकांना निवेदन देऊनही कोणतेच उत्तर दिले गेले नसल्याने विद्यार्थ्यांनी संचालकांच्या कार्यालयासमोर याचा निषेध नोंदविला.
एफटीआयआय प्रशासनाने नवीन अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर शिक्षणपद्धतीमध्ये पारदर्शकता आणण्याकरिता काही बदल केले. त्यामध्ये प्रत्येक सेमिस्टरनंतर सर्व विभागाच्या प्राध्यापकांच्या शिकविण्याच्या दर्जाबाबत विद्यार्थ्यांकडून फिडबॅक देणारी यंत्रणा विकसित केली आहे. त्यानुसार शैक्षणिक कार्यालयातर्फे विद्यार्थ्यांकडून हा फिडबॅक घेतला जातो. सेमिस्टर पद्धत लागू करूनही विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. दरम्यान यासंदर्भात सिनेमॅटोग्राफी विभागप्रमुख प्रसन्न जैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला.

तिसरे सेमिस्टर सुरू; अपुरी साधनसामुग्री उपलब्ध
शिक्षकांचे अभ्यासक्रमाबाबत नियोजन नसणे, शिकविण्याच्या संकल्पना स्पष्ट नसणे, विषयांतर करून बोलणे अशा स्वरूपाच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्यामुळे २०१६ आणि २०१७ बॅचच्या विद्यार्थ्यांच्या दुसरे सेमिस्टरच्या पूर्ततेनंतर फिडबॅकवरच ‘रोख’ लावण्यात आला. आता तिसरे सेमिस्टर सुरू झाले तरी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. यातच विद्यार्थ्यांना अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे दिवस आणि रात्रपाळीमध्ये प्रॅक्टिकल्स पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.
ज्याप्रमाणे दिवसा काम करताना चित्रकला, सुतारकाम किंवा इतर गोष्टी मिळतात, त्या रात्रपाळीतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत का? सध्या जे कॅमेरे आहेत ते वरिष्ठ विद्यार्थ्यांना शूटसाठी देण्यात आले आहेत, मग आम्हाला कोणते कॅमेरे किंवा लाईटिंग युनिटस उपलब्ध करून दिले जाणार? असे अनेक प्रश्न सिनेमॅटोग्राफीच्या विद्यार्थ्यांनी संचालकांसमोर निवेदनाद्वारे उपस्थित केले आहेत.

संचालक भूपेंद्र कँथोला यांच्याकडून कोणतीही उत्तरे देण्यात आलेली नाहीत. यासाठी विभागातील दहा विद्यार्थ्यांनी विस्डम ट्री बाहेर आंदोलन केले. मात्र संचालकांनी दहा विद्यार्थ्यांशी बोलण्यास नकार दिला. केवळ दोन विद्यार्थ्यांनाच भेटता येईल, अशी अट टाकली, विद्यार्थी भेटले असता विभागप्रमुखांशी बोलावे, असे सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांचे निवेदन विभागप्रमुखांकडे पाठविले आहे. विद्यार्थ्यांना काय सांगायचे, यात मला पडायचे नाही. विभागप्रमुख पाहून घेतील.
- भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय

Web Title: Students are 'unaware' about curriculum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.