सलग 14 तास अभ्यास करुन विद्यार्थी करणार महामानवांची जयंती साजरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 16:28 IST2019-04-12T16:26:31+5:302019-04-12T16:28:37+5:30
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्याेतिबा फुले यांची संयुक्त जयंती पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी सलग 14 तास अभ्यास करुन अनाेख्या पद्धतीने जयंती साजरी करणार आहेत.

सलग 14 तास अभ्यास करुन विद्यार्थी करणार महामानवांची जयंती साजरी
पुणे : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्याेतिबा फुले यांची संयुक्त जयंती पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी सलग 14 तास अभ्यास करुन अनाेख्या पद्धतीने जयंती साजरी करणार आहेत. उद्या सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत विद्यार्थी अभ्यास करणार आहेत.
महात्मा फुले यांनी बहुजनांना शिक्षणाची दारं खुली करुन दिली. तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा, असा संदेश दिला. या दाेन्ही महामानवांच्या कार्याची प्रेरणा घेत सलग 14 तास अभ्यास करुन या महामानवांना विद्यार्थी अभिवादन करणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीने महामानवांची जयंती फर्ग्युसन महाविद्यालयात साजरी केली जाते. फर्गुसन महाविद्यालयाच्या सी 6 हाॅलमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
याविषयी बाेलतना या उपक्रमाचा आयाेजक सुनील जाधव म्हणाला, डिजे लावून आंबेडकरांची जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे आहे. डिजे लावून जयंती साजरी करणे म्हणजे एकप्रकारे महामानवाच्या जयंतीचे विद्रुपीकरण आहे. आंबेडकरांचा विचार समाजात रुजवणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही महामानवांची जयंती ही सलग 14 तास अभ्यास करुन साजरी करणार आहाेत. या उपक्रमात शंभर ते दीडशे विद्यार्थी सहभागी हाेणार आहेत. त्याचबराेबर विद्यार्थ्यांना विविध सामाजिक विषयांवरील पुस्तके देखील वाटण्यात येणार आहेत.